मुंबई- राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या चौकशी नुसार अँटिलिया या इमारतीच्या बाहेर सापडलेल्या मोटारीतील जिलेटिनच्या कांड्या या स्वतः सचिन वाझेने विकत घेतलेल्या होत्या, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सुत्रांकडून समजली आहे. मात्र, याच जिलेटिनच्या कांड्या त्याने कधी व कुठून विकत घेतल्या होत्या याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. या जिलेटीन कांड्या नागपूरमधील सोलर इंडस्ट्रीज कंपनीने बनवलेल्या असल्याचे यापूर्वीच समोर आलेले होते.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील मोटारीत सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. यातील मुख्य आरोपी म्हणून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यास अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत.
जिलेटिनच्या कांड्या या स्कॉर्पिओ गाडी सापडलेल्या आहेत त्या जिलेटिनच्या कांड्या एका बॉक्समध्ये होत्या. त्या बॉक्सचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत आहे . राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रानुसार जिलेटिनच्या कांड्यांचा त्या बॉक्सवर एक विशेष 'क्यू आर कोड' असून हा क्यू आर कोड जर राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाला तर जिलेटिनच्या कांड्या या केव्हा विकण्यात आल्या होत्या व त्या कोणी विकल्या याचा छडा लावणे सोपे जाणार आहे.