मुंबई Gateway of India Garbage Issue : मुंबई महापालिकेनं गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचरा फेकणाऱ्या व्यक्तीला 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. या व्यक्तीनं मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात कचरा टाकला होता. कचरा टाकल्याबद्दल महापालिकेनं लावलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे. दंड आकारण्याची कारवाई अ प्रभागाकडून करण्यात आली आहे. हाजी अब्दुल रहमान शाह कादरी असं दंड ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. समुद्रात कचरा फेकताना अज्ञात व्यक्तीनं हाजी अब्दुल रहमान शाह कादरीचा व्हिडिओ शूट केला होता. हा व्हायरल झालेला व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील शेअर केला. त्यामुळे महापालिकेनं या व्यक्तीचा शोध घेवून ही दंडात्मक कारवाई केली आहे.
गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात फेकला कचरा : महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टॅक्सीतून उतरुन गेट वे ऑफ इंडियाजवळ फुलांचा कचरा समुद्रात फेकताना दिसत आहे. महापालिकेनं मुंबई पोलिसांच्या मदतीनं व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबर ट्रेस करून त्या व्यक्तीची ओळख पटली. 58 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये काही नागरिक टॅक्सीतून कचरा आणताना दिसत होते. मग ते गाडी समुद्राच्या किनाऱ्यावर उभी करतात, पूजेनंतर उरलेली सुकी फुलं, पिशवीत भरलेली सुकी फुलं आणि इतर वस्तू पटकन समुद्रात टाकून निघून जातात. एका व्यक्तीनं याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.