मुंबई :भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवानंतर माघ महिन्यातील गणेश जयंतीचे गणेश भक्तांना वेघ लागते. यानिमित्ताने मूर्तीकारांनी देखील त्यांच्या कलाकारीद्वारी मूर्तींची निर्मिती करायला सुरूवात केली आहे. माघ गणेश जयंतीनिमित्त गणेशमूर्तींचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
दोन वर्षांनी पुन्हा बाप्पांची धामधूम :सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पा यांचा माघ गणेशोत्सव अर्थात गणेश जयंती २५ जानेवारी रोजी असून त्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मुंबईतील विविध कारखान्यांमध्ये मूर्तिकार गणरायांच्या मूर्तीला अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. विविध रूपातील गणपती बाप्पांच्या मुर्त्या इथे कारखान्यात दिसत आहेत. वास्तविक माघ महिन्यात घराघरात गणपती बाप्पा विराजमान करण्याचं प्रमाण दरवर्षी वाढत आहे. या कारणास्तव गणपती बाप्पाच्या विविध रूपांतील छोट्या व सुंदर मूर्त्या भक्तांचे आकर्षण बनत आहेत. भक्तांच्या इच्छे नुसार गणपती बाप्पा विघ्नहर्तानेच करोनाच सावट पूर्णतः दूर केल्याने दोन वर्षानंतर हा उत्सव आता पुन्हा एकदा धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यासाठी मूर्ती कारखान्यांपासून ते बाजारपेठापर्यंत तयारी पूर्ण झालेली आहे.
भक्तांमध्ये उत्साह : २५ जानेवारीला गणपती बाप्पाच आगमन होत असून २६ जानेवारीला गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. विशेष करून गणेश चतुर्थी अर्थात भाद्रपद महिन्यामध्ये अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन होते. त्याचबरोबर सार्वजनिक गणपती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विराजमान केले जातात. त्या कारणास्तव बऱ्याच लोकांना, भाविकांना अनेक ठिकाणी बाप्पासाठी भेटीगाठी द्यायच्या असल्याने त्यांना इच्छा असूनही आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान करता येत नाहीत. परंतु आत्ता माघ महिन्यांमध्ये अनेक भक्तगण गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान करत असतात. यामध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या महिन्यात तशी भक्तगणांना थोडी सवड सुद्धा असते. फक्त दोनच दिवस गणपती बाप्पांचा घरात पाहुणचार होणार असल्याने अनेक भक्तगण भक्ती भावाने पूजा अर्चा करत असतात. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब यामध्ये मग्न झालेलं दिसून येतं.