महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील गणेश विसर्जनाच्या घडामोडी एका क्लिकवर - maharashtra ganesh visarjan

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असतानाही भक्तांचा उत्साह मात्र कायम होता. गणपती विर्सजनाच्या वेळी प्रशासनाकडून वेळोवेळी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत होते. नागरिकही सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर सारख्या नियमांचे काटेकोर पालन करताना दिसून आले.

ganesh visarjan in various districts of maharashtra
राज्यातील गणेश विसर्जनाच्या घडामोडी एका क्लिकवर

By

Published : Sep 2, 2020, 11:20 AM IST

मुंबई -यंदा राज्यभरात मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. कोरोनाचे सावट असतानाही भक्तांच्या उत्साहात कोणतीही कमी दिसून आली नाही. योग्य खबरदारी घेत आणि सोशल डिस्टंसिंग तंतोतंत पालन करत गणपती विर्सजनाचा विधी पार पडला. यंदा घरगुती आणि मंडळाचा गणपती विर्सजनासाठी कृत्रिम तलावाकडे भक्तांचा कौल जास्त असल्याचे दिसून आले. तर विर्सजनावेळी अनेक गणपती मंडळांकडून सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. अशाच प्रकारे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पार पडलेल्या गणेश विसर्जनाचा थोडक्यात घेतलेला आढावा...

मुंबई-'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', अशा जयघोषात भक्तिमय वातावरणात आणि जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मुंबईत विसर्जनाला गर्दी दिसत नाही. पालिका व राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करत यंदा विसर्जन होत आहे . कोणतीही मिरवणूक नाही , अंत्यत साध्या पद्धतीने मोजक्याच भाविकांसह विसर्जन सोहळा पार पडत आहे. पोलीस बंदोबस्त तसेच पालिका कर्मचारी गिरगाव चौपाटीवर तैनात आहेत. मुंबईत बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक भाविक भक्त गिरगाव चौपाटीवर दाखल झाले होते. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर वाजत गाजत बाप्पाला निरोप द्यायला मिळत नाही, याची खदखद या भक्तांमध्ये पाहायला मिळाली आहे. शासनाने वादन फटाके यावर बंधने आणल्यामुळे एका भाविकांने चक्क सायकलवर विसर्जनाची मिरवणूक काढली होती.

मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेले 92 वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधे पणाने उत्सव साजरा करताना 4 फुटाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईच्या राजाचे मंडपाजवळ उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.

पुणे - गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळतो. विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी अनेक कलाकार आपली कला सादर करतात. विसर्जन मिरवणुकीत कुठे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर होतात तर कुठे ढोल ताशाचा आविष्कारही पाहण्यास मिळतो. मात्र, यंदा कोरोना महामारीने गणेश विसर्जन अगदी साध्या पद्धतीने पार पडला. विसर्जन मिरवणूक रद्द झाली असली तरीही राष्ट्रीय कला अकादमीने मात्र, आपल्या रांगोळीच्या उपक्रमात खंड पडू दिला नाही.

अकादमीचे कार्यकर्ते मानाच्या पाच आणि इतर प्रमुख गणेश मंडळासमोर जाऊन रांगोळी रेखाटली आहे. या रांगोळी सामाजिक संदेश दिला आहे. मानाचा पाचवा असलेल्या केसरीवाडा गणपती समोर अकादमीच्या कार्यकर्त्यांनी मास्क घातलेल्या एका पुणेकराची भली मोठी रांगोळी रेखाटन सामाजिक संदेश दिला. अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पुष्पहारांनी सजविलेल्या आणि कलशाची प्रतिकृती असलेल्या गजकुंडात गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. या विसर्जन सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपणही करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'आपल्या बाप्पाचं, आपल्याच घरी विसर्जन' करा असे आवाहन पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते. घरगुती गणेश विसर्जनासाठी यंदा पुणे महानगरपालिकेतर्फे १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण १९१ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. तसेच ज्या नागरिकांना घरच्या घरी मूर्ती विसर्जन करणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी महानगरपालिकेमार्फत कृत्रिम हौदांंची निर्मिती करण्यात आली होती. यंदा फिरत्या हौदांमध्ये २०,५४० मूर्ती विसर्जन व संकलन केंद्रावर २४,०१३ मूर्ती संकलन असे एकूण ४४५५३ गणेश विसर्जन झाले असल्याची माहिती महापौरांनी दिली.

धुळे - शहरातील सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या हौदात भक्तांनी आपल्या घरगुती गणरायाचे विधीवत विसर्जन केले. यावेळी नागरिकांनी करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी केले होते. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अहमदनगर- नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरातील उत्सवमूर्तीचे मंगळवारी परंपरे नुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी उत्थापन पूजा करण्यात आली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक नसल्याने उत्थापन पूजे नंतर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मोजके विश्वस्त आणि भक्तांच्या उपस्थितीत उत्थापन पूजा करण्यात आली. श्री विशाल गणेश हे शहराचे ग्रामदैवत असून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत विशाल गणेशाची उत्सवमूर्ती ही मानाची आणि अग्रभागी असते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात विसर्जन मिरवणूक टाळण्यात आली. मात्र उपस्थित जिल्हाधिकारी, विश्वस्थ आणि मोजक्या भक्तांच्या उपस्थित जागेवरच विसर्जन करण्यात येत गणेशाला पुढल्या वर्षीचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले..

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठीकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा झाला विसर्जनाच्या निमित्ताने घरगुती गणपती बापाच्या विसर्जना साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये ह्यासाठी नाशिकच्या पंचवटी एसटी बस डेपो आगराने मूर्ती संकलनासाठी एसी बस रस्त्यावर उतरवली. एसटीच्या या सामाजिक बांधिलकीचे भाविकांनी स्वागत केलं...नाशिक मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदाच्या वर्षी सध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला.ह्यासाठी भविकांनी देखील प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले. पर्यवरण रक्षणासाठी नाशिक महानगरपालिका आणि सामजिक संस्थांनी नदी काठी ठिकठिकाणी कृत्रिम कुंड तयार करून भविकांनी गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते त्याला नाशिककर भविकांनी मोठा प्रतिसाद दिला .

हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच परिस्थिती बदलून गेलेली आहे. कोरोना न होऊ देण्यासाठी प्रशासन, आरोग्य प्रशासन काळजी घेत आहे. अशाच परिस्थितीत गणेशोत्सव अतीशय साध्या पध्दतीने साजरा केला. तर विसर्जनाच्या दिवशी ही गर्दी टाळण्यासाठी हिंगोली नगर पालिकेने अनोखा फंडा वापरत चालते फिरते विसर्जन केंद्र सुरू केले होते. त्यामूळे गर्दीही झाली नाही आणि तलावावर देखील नागरिकांनी टाळले. एका कॉलवर फिरते केंद्र दारात अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

नाशिक- कोरोना मुळे 100 वर्षात पहिल्याच नाशिकच्या रविवार कारंजा मित्र मंडळाच्या मानाच्या चांदीच्या गणपतीचं विसर्जन सध्या पद्धतीने मंदिरा समोर करण्यात आलं..कोरोनामुळे यंदा अनेक सर्वत्र धार्मिक,संस्कृतीक कार्यक्रमावर मर्यादा आल्या असून कोरोना मुळे अनेक गोष्टी पहिल्यांदा घडल्या आहेत.नाशिकच्या पाच मानाच्या गणपती पैकी एक म्हणजे रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती हा बाप्पा नाशिककरांचे श्रद्धा स्थान आहे..अनेक भाविक रोज सकाळी ह्या बाप्पाचे दर्शन घेऊन कामास सुरवात करता..ह्या बाप्पाकडे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची मान्यता आहे..दर वर्षी रविवार कारंजा मित्र मंडळाकडून गणेशोत्सव भव्य देखावा सादर करण्यात येतो तसेच विसर्जनाच्या दिवशी भव्य मिरवणूक काढली जाते..मात्र यंदा पहिल्यांदा कोरोना मुळे मंदिराच्या आता 10 दिवस बाप्पाचे धर्मिक कार्यक्रम पार पडले..तसेच 100 वर्षात पहिल्यांदा मानाच्या बाप्पाचे मंदिर समोर विसर्जन करण्यात आलं..

कोल्हापूर - कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाट परिसर आज आनंतचतुर्थीच्या दिवशी निर्मनुष्य पाहायला मिळाला. दरवर्षी पंचगंगा नदीमध्ये शहरातील शेकडो मूर्तींचे विसर्जन होत होते. मात्र यंदा पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन इराणी खणीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकही व्यक्ती सद्या पंचगंगा नदी घाट परिसरात पाहायला मिळाला नाही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयघोष या संपूर्ण परिसरात ऐकायला मिळायचा मात्र पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून नदीमध्ये विसर्जन न करण्याचा प्रशासनाने खुप चांगला निर्णय घेतला त्याला सर्वच मंडळांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. कोणीही नदीमध्ये गणपती मूर्तींचे विसर्जन करणार नाही याची काटेकोरपणे खबरदारी सुद्धा घेतली जात आहे.

रत्नागिरी- 'गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या' आशा जयघोषात मात्र ढोल-ताशांच्या गजराशिवाय पण भक्तिमय वातावरणात 11 दिवसांच्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. जिल्ह्यात आज 36720 घरगुती तर 48 सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आलं. कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन होऊ नये यासाठी विसर्जन मिरवणुकांवरील बंदीही कायम ठेवण्यात आली होती. गेले 11 दिवस जिल्ह्यात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते . गणपतीच्या आगमनाने सर्वत्र नवचैतन्य निर्माण झाले होते. 11 दिवसांच्या पाहुणचारानंतर आज अनंत चतुर्दशीदिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. समुद्रकिनारी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांंची निर्मितीही करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही गणेशमूर्ती विसर्जनावेळी विशेष खबरदारी घेतली जात होती. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने आज गणरायाला निरोप देण्यात आला.

यवतमाळ: नवसाला पावणारा आणि मानाचा म्हणून यवतमाळचा राजा गणपतीची ओळख आहे. या गणपतीला वाजत गाजत निरोप देण्यात आला. 1964 ला नवयुवक गणेश मंडळाने मारवाडी चौकात यवतमाळच्या राजाला स्थापना करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या संकट काळात गणेश मंडळाने आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावले. कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्च मंडळाकडून केला जाणार आहे. कोविड काळात मंडळामार्फेत मार्च महिन्यापासून मास्क, भाजीपाला, धान्यकीटचे 50 हजारांपेक्षा अधिक वाटप करण्यात आले. लकडगंज परिसरातील राणी सती विहिरीत यवतमाळच्या राजाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर संपूर्ण महाराष्टात सगळ्यात लहान मुर्ती असलेल्या दारव्हा येथील ओम गणेश मंडळानेदोन इंचाच्या चिमुकल्या बाप्पाचे विसर्जन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले.

बदनापूर(जालना): कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बदनापूर प्रशासन विविध उपाययोजना करत असून गणेश विसर्जनासाठी पोलिस प्रशासन व नगर पंचायततर्फे घरघुती मुर्ती संकलित करुन सोमठाणा येथे त्यांचे विसर्जन करण्यात आले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पाहता शासनाने विविध बंधने घातलेली असतानाच महाराष्ट्रातील प्रमुख उत्सव असलेला गणेशोत्सव बदनापूरात शांततेत व शासनाच्या नियमाधिन करण्यात आला. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव न करता काही मंडळाने सामाजिक कार्यक्रम आयोजित केले. मात्र घराघरातून गणेशाची स्थापना करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने बदनापूरचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी पुढाकार घेऊन नगर पंचायतच्या सहकार्याने वैयक्तीक गणेश विसर्जन न करण्यासाठी नगर पंचायतमार्फत वाहने उपलब्ध करून विसर्जन करण्यासाठी बैठक घेऊन त्या दृष्टीने तयारी केली होती.

औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोनाचा चांगलाचा परिणाम दिसून आले दरवर्षीपेक्षा यंदाच्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये 70 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे दिसून आले. तसेच घरघुती गणपतीची संख्याही यंदा कमीच होती. दरवर्षी औरंगाबाद शहरात जवळपास 850 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळ परवानगी घेत असतात मात्र यावर्षी अवघ्या 244 गणेश मंडळांनी परवानगी घेतली होती. या वर्षी जरी कोरोनाचे नियम गणेश विसर्जनासाठी लावण्यात आले असले, तरी हे नियम पुढच्या वर्षी लावू नये. कारण कोरोना असो किंवा नसो आम्ही पूर्वीप्रमाणेच जल्लोषात गणेशोत्सव साजरा करू असं वक्तव्य शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादेत केलं. संस्थान गणपतीच्या आरती नंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असते. मात्र कोरोनाचे संकट पाहता यंदा मिरवणूक रद्द करण्यात आल्याने. शाडू मातीची असलेली संस्थान गणपतीची मूर्ती मंदिरासमोरच कृत्रिम हौद तयार करून त्यात विसर्जित करण्यात आली. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details