मुंबई - दलित पँथरचे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांच्या पार्थिवावर दादर येथील चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रोळीतील राहत्या घरी मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते.
राजा ढाले यांच्यावर चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
राजा ढाले यांच्या अंत्ययात्रेत सामाजिक,साहित्यिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
बुधवारी 12 वाजता विक्रोळी येथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अंत्ययात्रेत सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री अविनाश महातेकर, माजी खासदार एकनाथ गायकवाड, साहित्यिक अर्जुन डांगळे, भन्ते राहुल बोधी अंत्ययात्रेत सहभागी झाले.
भन्ते राहुल बोधी यांनी बुद्ध वंदना घेतल्यानंतर राजा ढाले यांच्या अंत्ययात्रेला विक्रोळी येथून सुरुवात झाली. अंत्ययात्रा टागोर नगर, कन्नमवार नगर, घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर याठिकाणी काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.