मुंबई- मुंबईच्या वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या सायन उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले होते. या कामाचा पहिला टप्पा मागील आठवड्यात पूर्ण केला आहे. दुसऱ्या टप्प्यात आज सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 2 मार्च सकाळी 7 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. या काळात उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णत: बंद असणार आहे. वाहनचालकांनी मुंबईत प्रवेश करताना व बाहेर पडताना पर्यायी मार्गावरून वाहतूक करावी, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
मुंबई शहरात व पूर्वउपनगरात वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या या पुलाचे बांधकाम 20 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम वर्षभर रखडले होते. मागील आठवड्यातील 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याचा परिणाम पुलाखालील आणि परिणामी पूर्व द्रूतगती महामार्गावरील वाहतुकीवर झाला. सायनपासून कुर्ला आणि माटुंग्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. दोन्ही बाजूची वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. या पुलबंदीचा फटका मुंबईबाहेर पडणाऱ्या वाहनचालकाना चांगलाच बसला होता. वाहतुकीच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे महत्त्व लक्षात घेता आठवड्यातील केवळ चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येईल, असे एमएसआरडीसीने सांगितले. एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर केले आहे. पहिल्या ट्रॅफिक ब्लॉकमध्ये उड्डाणपूलाचे 32 बेअरिंग बदलण्यात आले आहे.