मुंबई -शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ईडीने केलेली ही कारवाई लोकशाहीच्या दृष्टिने दडपशाहीच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. जे नेते भाजपा विरोधात टीका करतात त्यांना भाजपाकडून टार्गेट केले जाते, असेही ते म्हणाले.
दानवेंच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार-
येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल, असे विधान रावसाहेव दानवे यांनी औरंगाबाद येथे केले होते. त्यांच्या विधानावर भुजबळ यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही. तो विषय सोडून द्या, मात्र राज्यात आमचे सरकार पुढील पाच वर्षे टिकणारच आहे. तसेच पुढे सुद्धा आमचे सरकार येणार आहे. त्यामुळे भाजपाच्या लोकांचे हे दिवास्वप्न बघण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांनी ते पाहावेत, अशी टीकाही भुजबळ यांनी केली.