मुंबई Fraud in Mumbai : आंतरराष्ट्रीय शिपिंग कंटेनर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची 16 कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट वाऊचर व कागदपत्रांद्वारे कंपनीमध्ये खोट्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करून तीन महिन्यांमध्ये ही रक्कम हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकरण :याप्रकरणी सहार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक महाडिक हे गेल्या सहा वर्षांपासून इंटर एशिया शिपिंग लाइन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय तैवानमध्ये आहे. या प्रकरणातील तक्रारदार अल्बर्ट नारहोना (वय ५९) हे कंपनीचे आर्थिक सल्लागार असून ते कंपनीच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित काम पाहतात. नारहोना 10 ऑगस्ट ला कंपनीच्या बँक खात्याचे स्टेटमेंट पाहत होते. त्यावेळी त्यांना 14 जुलै ला झालेला 80 लाख रुपयांचा व्यवहार संशयास्पद वाटला. त्यावेळी त्यांनी या व्यवहाराबाबत अधिक चौकशी केली असता ही रक्कम महाडिक यांच्या पगार खात्यात जमा झाल्याचं उघड झालं.
17 कोटी 45 लाख रुपयांचा गंडा : त्यानंतर नरहोना यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीच्या बँक खात्यांची तपासणी केली असता 12 मे ते 9 ऑगस्ट दरम्यान महाडिक यांनी 17 कोटी 45 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत महाडिक यांनी पीडीए ॲडव्हान्स, रिफंड आणि व्याजाच्या नावाने बनावट व्हाउचर, बनावट ई-मेल, टॅली व्हाउचर आणि परताव्यासाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे सादर केल्याचं उघड झालं.
पोलिसांत तक्रार दाखल : दरम्यान, कंपनीनं महाडिक यांच्याकडे या पैशांबाबत विचारणा केली असता, महाडिक यांनी १.०१ कोटी रुपये परत केले. मात्र उर्वरित रक्कम त्यांनी परत केली नाही. महाडिक यांनी पैसे परत न केल्याने कंपनीने त्यांच्याविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, सहार पोलिसांनी अभिषेक महाडिक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ४२०, ४०९, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलायं.
हेही वाचा :
- Financial Fraud Amravati: पोलीस ठाण्यात तक्रार देते म्हणून महिलेने उकळले १४ लाख रुपये
- Fraud : व्यवसायिकाला चौघांनी लावला 151 कोटींचा चुना
- Aftab Shivdasani : बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीची फसवणूक; बँक खात्यातून दीड लाख गायब