मुंबई - दादरच्या इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीचा आज होणारा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमावरून आणि त्याच्या निमंत्रणावरून मोठा वाद सुरू झाला होता. यावर आंबेडकर कुटुंबानेही नाराजी व्यक्त केली होती. एकूणच नियोजनात कमालीचा ढिसाळपणा दिसत होता. त्यामुळे शेवटी अवघे काही तास उरले असताना हा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) आली. तथापि, कार्यक्रम रद्द करण्याचे कारण एमएमआरडीएने सांगितले नाही.
डॉ. आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम काल अचानक जाहीर करण्यात आला. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज दुपारी 3 वाजता होणार होता. मात्र, या कार्यक्रमासाठी आंबेडकर कुटुंबातील प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण नव्हते. त्यामुळे आनंदराज यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तर केंद्रीय मंत्री आणि आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते रामदास आठवले यांनाही निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्याचवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात अनेक त्रुटी ही दिसत होत्या. अगदी प्रसार माध्यमांनाही कोणतीही माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमावरून सर्वत्र नाराजीचा सूर होता.
एमएमआरडीएने रात्री उशिराछोटेखानी कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता आनंदराज यांना एमएमआरडीएने निमंत्रण पाठवले. तर दुसरीकडे, मात्र आरपीआय कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तर, विरोधकांनीही यावरून सरकारला लक्ष्य केले. शेवटी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएने आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर केले. तर, हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून पुढील तारीख लवकरच जाहीर करू, अशी अधिकृत माहिती दिली आहे.
दादरच्या इंदू मिलमध्ये 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाचा चबुतरा 100 फूट आणि पुतळा 350 फूट अशी स्मारकाची उंची 450 फूट ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या स्मारकासाठी पूर्वी 763 कोटी 5 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली होती. पण स्मारकाची उंची वाढवण्यात आल्यामुळे स्मारकाचे डिझाइनही बदलणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेनुसार प्रकल्पासाठी 1 हजार 89 कोटी 95 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला गेल्याने आता नवीन तारीख निश्चित करुन पायाभरणी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.