मुंबई- कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना मुंबईत मच्छी विक्री बंद करण्यात आली आहे. मात्र माहीम विभागात अवैधरित्या मच्छी विक्री होत असून त्याला पालिका बंदी घालत नसल्याने शिवसेनेच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेवक असलेल्या मिलिंद वैद्य यांना रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागले आहे.
अवैध मच्छी विक्रीविरोधात शिवसेनेच्या माजी महापौराचे रस्त्यावर धरणे आंदोलन - शिवसेना माजी महापौरांचे आंदोलन
मुंबई महापालिका व राज्यात शिवसेना सत्तेत असताना पक्षाच्या एका माजी महापौरांना व विद्यमान नगरसेवकाला आंदोलन करावे लागत आहे. माहीम विभागात अवैधरित्या मच्छी विक्री होत असून त्याला पालिका बंदी घालत नसल्याने शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य आंदोलन करत आहेत.
मुंबईच्या माहीम येथे मच्छी विक्री करणाऱ्याना कोरोनामुळे विक्री करू नका असे सांगण्यात आले. त्याचवेळी अवैधरित्या या विभागात मच्छी विक्री सुरू आहे. त्यामुळे जे विक्रेते वर्षानुवर्षे मच्छी विक्री करत होते. त्यांच्यावर अन्याय होत आहे, अशी तक्रार येथील विक्रेत्यांची आहे. मच्छी विक्रेत्यांच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेवक आणि मुंबईचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी अवैध विक्री बंद करण्याची मागणी केली. मात्र पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज वैद्य यांनी माहीम येथे रस्त्यावर बसून आंदोलन केले.
अवैध मच्छी विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी वैद्य यांनी केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. सेनेची सत्ता असताना त्यांच्या पक्षातील माजी महापौर राहिलेल्या नगरसेवकाला आंदोलन करावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.