मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, 'सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्याप्रकारे हाताळले जात आहे - मला वाटते, मुंबईने मानवता गमावली आहे आणि ती निर्देश, स्वाभिमानी नागरिकांना जगण्यासाठी सुरक्षित नाही.' अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर अनेक स्तरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी पोलीस अधिकारी अॅडव्होकेट विश्वास कश्यप यांनीही याबाबत त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर अमृता यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात ते म्हणाले, पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या. मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल, आपल्याला काय आणि किती माहिती आहे? त्याबाबत आपला काय अभ्यास आहे? मुंबई पोलिसांच्या कार्याबद्दल तुम्ही कुठे दोन-चार ओळी वाचल्या आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले. पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नाही. मात्र, मुळात पोलिसांचा तपास कसा असतो ? काय असतो ? तो तपास कसा केला जातो ? याबाबत आपल्याला थोडेतरी कायदेशीर ज्ञान आहे का? आपण एक्सेस बँकेत काम करणाऱ्या एक कारकून महिला आहात. आमच्या दृष्टीने जरी कोणी क्लास वन, क्लास टू असला तरी तो कारकुंडाच बरं का. कारण क्लास कोणताही असो शेवटी काम कारकुनाचेच, असेही कश्यप म्हणाले.
कश्यप पुढे म्हणाले, आपल्या पतीदेवाच्या कृपेने त्या मृत झालेल्या अॅक्सिस बँकेला संजीवनी देण्याचे मोठे देशकार्य आपण केलेत. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगार अॅक्सिस बँकेत वळविलेत असे समजते. कोट्यवधी रुपयांचा तो व्यवहार होता. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने तो आर्थिक घोटाळाच आहे, असे आपणास वाटत नाही का? त्यावेळी सरकारी कार्यालयातील युनियननेसुद्धा त्याबाबत काही जोरदार आक्षेप घेतल्याचे दिसले नाही. नाहीतर सरकारी वेळेपेक्षा 12-13 मिनिटे जास्त काम करायला सांगितले तर संघर्ष करायला ही मंडळी फणा काढून उभी असतात, अशी टीकाही कश्यप यांनी केली.
कश्यप यांनी अमृता फडणवीस यांना लिहिलेले सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे,
'आपण मुख्यमंत्रीपत्नी झाल्या झाल्या अॅक्सिस बँकेने आपली बदली नागपूरहून डायरेक्ट मुंबईला केली. येथे सर्वसाधारण बाईला दादर पूर्व शाखेतून दादर पश्चिम शाखेत बदली करून घ्यायची असेल तर काय दिव्य करावे लागते हे त्या माउलीला विचारा कधीतरी? अॅक्सिस बँकेला तुम्ही दिलेल्या संजीवनी बुटीमुळे त्यांनी लगेचच आपल्याला मोठे पद बहाल केले. तेसुद्धा खालल्या मिठाला जागले हो. नाहीतर साध्या कर्मचाऱ्याने बँकेसाठी कितीही मोठा धंदा केला तरी त्याला कोणीही हिंग लावून विचारत नाही. तुम्हाला मात्र बँकेने मोठी बढती दिली. बढतीबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही. मात्र, बढती ही स्वतःच्या हिमतीवर असावी. नाही का ?
सुशांतसिंह प्रकरणात तुम्ही लक्ष घालायला नको बाईसाहेब. ही फिल्मी मंडळी कशी आहेत हे आपल्याला माहीत नाही. ते आम्हा पोलिसांना विचारा. ही मंडळी एक नंबरची स्वार्थी आणि घाणेरडी असतात. नैतिकता वगैरे शब्द त्यांनी केव्हाच गुंडाळून त्यांच्या बेडखाली ठेवलेल्या असतात. तर अशा या फिल्म इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला इतकी का आपुलकी वाटावी? तुम्हाला त्यांच्या जंगी पार्ट्यांमध्ये गाण्याची संधी दिली म्हणून की काय? त्या अमिताभ बच्चनबरोबर जाहिरात करण्याची संधी मिळाली म्हणून की काय? अहो त्या अमिताभ बच्चनसारखा स्वार्थी माणूस संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोधून सापडणार नाही.
स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय तो कोणाकडे बघून हसत सुद्धा नाही. त्याने संपूर्ण लॉकडाऊनमध्ये कोणा गरीबाला पाच किलो तांदूळसुद्धा वाटले नाहीत हो. आपण फक्त मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती आहात म्हणून अमिताभने आपल्याबरोबर जाहिरात केली. मात्र, त्या सर्व घटनाक्रमात आपण स्वतः मात्र फारच मोठ्या सेलिब्रेटी असल्याचा समज करून घेतलात. कपूर खानदान, खान खानदान, खन्ना खानदान याबरोबरच फडणवीस खानदान बनविण्यासाठी आपण प्रयत्न करू लागलात. परंतु, महाराष्ट्रात सत्तापालट झाली आणि आपले खानदान मोडीत निघाले. असो. बॅड लक.
मुद्दा असा आहे की, सुशांतसिंह प्रकरणात तुम्ही मुंबई पोलिसांना दोष दिला. मुंबई सुरक्षित नाही असे तुम्ही म्हणालात. बाईसाहेब तुम्ही सहा वर्षांपूर्वी नागपुराहून मुंबईत आलात आणि लगेचच मुंबई पोलिसांना सर्टिफिकेट दिलेत. वर्षानुवर्षे मुंबईत राहणाऱ्या कोणत्याही स्त्रीला विशेषतः परप्रांतीय स्त्रीला विचारा तिला मुंबईत सुरक्षित वाटते की तिच्या राज्यामध्ये? ती पोलिसांविषयी गैरसमजुतीतून दोन गोष्टी वाईट बोलेल पण ती जास्त सुरक्षित मुंबईमध्येच आहे हे विश्वासाने सांगेन.
बाईसाहेब, बँकेची आकडेमोड करता करता मुंबई पोलिसांच्या कामाचा ग्राफ आणि देशातील इतर राज्यातील पोलिसांचा ग्राफ याचा कधीतरी शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी अभ्यास करीत चला. मुंबई पोलीस इतक्या वाईट आणि अवघड परिस्थितीत त्यांचे कर्तव्य करीत असून सुद्धा जगात दोन नंबरचे नावाजलेले पोलीस दल आहे. नंबर दोन. आणि त्या मुंबई पोलिसांना तुम्ही नावे ठेवत आहात? कोणत्या अधिकाराने? फक्त माजी मुख्यमंत्री पत्नी आहात म्हणून?
कोरोना महोत्सवात आमचे शेकडो पोलीस बांधव शहीद झालेत. जीवावर उदार होऊन दिवसरात्र, उन्हातान्हात, पावसात रस्त्यावर उभे राहून ते जनतेसाठी कर्तव्य करीत आहेत आणि तुम्ही तुमच्या फिल्मी स्टाईलने पोलिसांना बदनाम करत आहात. तुमच्या 'फडणवीस' घराण्यातील कोणी आहे का पोलीस खात्यात? नाही ना? कोरोना महोत्सवात शहीद झालेल्या एकातरी कुटुंबाच्या घरी जाऊन तुम्ही त्यांची सांत्वनपर भेट घेतलीत का हो? त्यांची कुटुंबे कोणत्या अवस्थेत जगत आहेत, जगणार आहेत याचा कधीतरी आपण विचार केलात का?