मुंबई :नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आज नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी संपल्याने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने पुन्हा 14 दिवसांची कोठडीत वाढ केली आहे. नवाब मलिक यांना किडनीचा आजार असल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार करण्याकरिता अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने अर्ज मंजूर केल्यानंतर सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते आज न्यायालयात हजर होऊ शकले नाही.
नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप?नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
हसीना पारकरच्या मुलाच्या जबाब महत्वाचा : दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलिशाह पारकर हा मुंबईत राहतो. गोवावाला कंपाऊंडचा काही भाग नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा त्याने केला. नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली. अशात अलीशाह पारकरचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. ज्यामुळे ईडीने मलिक यांच्याविरोधात खटला उभा करण्यास मोलाची मदत केली.