मुंबई -100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांना अटक करण्यात आली होती. ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये ( Anil Deshmukh in Arthur Road jail ) आहे. देशमुख यांनी 04 जानेवारी मुंबई PMLA कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज मंगळवारी रोजी न्यायालयाने निकाल देत अनिल देशमुख यांचा अर्ज फेटाळून लावला. ( Anil Deshmukh Bail Application Rejected ) यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. मात्र, देशमुखांना जामीन मिळणे कठीण होऊन बसले आहे. विशेष म्हणजे, मुंबई सत्र न्यायालयाने आज अखेर अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. देशमुख आणि राज्य सरकारला हा सर्वात मोठा झटका आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटळण्याबाबतचा निर्णय विशेष पीएमएलए कोर्टाने आज दिला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र -
100 कोटी कथित प्रकरणात तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर गेल्या 78 दिवसांपासून अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांनादेखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.