मुंबई: शुक्रवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. शुक्रवारी दुपारी त्यांचा मांजरी येथे कार्यक्रम होता, मात्र हा कार्यक्रम त्यांनी रद्द केला. त्याशिवाय आगामी दोन दिवसांचे कार्यक्रमही रद्द केले होते. मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा त्यांनी केली नव्हती. आता माध्यमांवर याबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर अजित पवार यांनी समोर येत स्पष्टीकरण दिले आहे. अस्वस्थ वाटत असल्याने मी अचानकपणे माझे कार्यक्रम रद्द केले होते. यातून कुणीही गैरअर्थ काढू नये असे ते म्हणाले.
कुणालाही नव्हती कल्पना: शुक्रवारी दुपारी कार्यक्रम रद्द केल्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नव्हता आणि ते कुठे आहेत याची कल्पनाही नव्हती. त्यांच्यासोबत सात आमदार असल्याची जोरदार चर्चा होती. या आमदारांची नावेही समोर आली नव्हती. मात्र जर काही नवीन राजकीय नाट्य घडणार असेल तर केवळ सातच आमदार का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत होता.
शरद पवारांच्या भेटी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वी भाजपला बिनविरोध पाठिंबा दिला होता. 2019 मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी शरद पवारांच्या माहितीशिवाय झाला नसल्याचा दावा, अनेक राजकीय विश्लेषक करतात. तर शरद पवार यांनी नुकतीच घेतलेली नितीन गडकरी यांची भेट आणि एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अदानी यांच्या संदर्भात काहीसे समर्थन करणारे केलेले वक्तव्य, यामुळे पुन्हा एकदा संशयाला जागा निर्माण झाली आहे. तर नवीन राजकीय घडामोडी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुलाच्या विवाहासाठी तयारी?: दरम्यान अजित पवार हे आपल्या मुलाच्या लग्नासाठी स्थळ पाहण्यासाठी गेले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अथवा दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अजित पवार हे नक्की कुठे गेले हा प्रश्न राज्याला पडला आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेतानाचा फोटो ट्विट करत पुन्हा एकदा तोच प्रकार, किळसवाण राजकारण असे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा: MVA Mashal Morcha महाविकास आघाडीचा या तारखेला मुंबईत निघणार मशाल मोर्चा