मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० लाख कोटी रुपयांच्या कोविड पॅकेजचा तपशील जाहीर झाल्यावर हे खऱ्या अर्थाने प्रोत्साहन पॅकेज नसून नेहमीसारखा मोदींचा 'जुमलाच' आहे. या वेळचा जुमला 'आत्मनिर्भर' आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. चव्हाण यांनी आज झूम ॲपवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
मोदींचे पॅकेज म्हणजे 'आत्मनिर्भर' जुमला - पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनमानीमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचली आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देशातील स्थलांतरीत मजुरांवर प्रचंड मोठे संकट ओढवले, त्याला मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला.
मी स्वतः एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अर्थव्यवस्थेच्या (जी.डी.पी.च्या) किमान १० टक्के म्हणजेच २१ लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज (Fiscal Stimulus) द्यावे, अशी जाहीर मागणी केली होती. त्यानंतर १२ मे रोजी जेव्हा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली त्याचवेळी मी त्या घोषणेचे स्वागत केले. परंतु, अर्थमंत्र्यांच्या ५ प्रदीर्घ पत्रकार परिषदेतून या योजनेचा तपशील जाहीर झाला आणि देशाची घोर निराशा झाली आहे. त्या पॅकेजमध्ये रोख मदतीची तरतूद नाही. त्यात फक्त कर्ज काढण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कोणत्याही घटकाला थेट व त्वरीत दिलासा मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
मोदींच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये २० लाख कोटींपैकी फक्त २ लाख कोटी रुपये थेट खर्च होणार आहे, तर सुमारे १८ ते १९ लाख कोटी रुपयांचे हे कर्ज घेण्याचा सल्ला आहे. विविध क्षेत्रात पुढील पाच वर्षात पैसे खर्च करण्याची पंचवार्षिक योजना आहे. पण उद्योगांना व व्यापारी उपक्रमांना लॉकडाऊनमध्ये उत्पन्न नसल्यामुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याचा सल्ला म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
केंद्र शासनाची महसूली तूट ही रु. ५ लाख २ हजार ८३७ कोटींवर गेली असून राजकोषिय तोटा हा २०१९-२० मध्ये अंदाजित कर्ज रू. ७ लाख ६६ हजार ८४६ कोटी आहे. तसेच फेब्रुवारी २०२० अखेर केंद्राने घेतलेले कर्ज हे १० लाख ३६ हजार ४८६ कोटी म्हणजेच अंदाजित कर्जापेक्षा २ कोटी ६९ हजार कोटी अधिकच्या रकमेची आधीच उचल आर्थिक वर्षे संपण्याच्या आधीच घेतली असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. तसेच गोल्डमन सॅक्स या जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टमेंट बँकेने सुरुवातीला भारताची अर्थव्यवस्था - 0.4 टक्के असेल असे भाकीत केले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांनी आपला अंदाज बदलून आता २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था उणे पाच टक्के घसरेल, असा निर्वाणीचा इशारा दिला असल्याचेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.