मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयला देण्याचा निर्णय दिल्यानंतर काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विट करत हे प्रकरण सीबीआयला देण्यात यावे, यासाठी मुंबई पोलिसांनी नाहकपणे प्रतिष्ठेचा प्रश्न बनवू नये, अशी मागणी केली आहे.
'न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा' - संजय निरुपम ट्वीट बातमी
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. याबाबत मुंबई पोलीस नाहक प्रतिष्ठेचा प्रश्न बनवू नये, असे ट्विट काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी केले आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कामकाजावर कोणाला शंका नाही. पण, या प्रकरणी दिरंगाई करण्यात आल्याचे दिसून येत होते. नेमकी ही दिरंगाई कशामुळे होती याचे कारण सरकारला माहीत असले पाहिजे, असे सांगत निरुपम यांनी महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवले आहे. निरुपम यांचे ट्विटसरकारसाठी अडचणीचा असला तरी यावर आतापर्यंत काँग्रेसकडून कोणत्याही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज (19 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी या प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले. यावर संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.