मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सत्तेवर येताना देशातील काळा पैसा संपवण्याचा आपण विडा उचलण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी देशात नोटबंदी ही लागू केली. मात्र, देशातील देवास नाशिक, बंगलोर येथील नोटांच्या छापखान्यामधून पाचशे रुपयांच्या १ हजार ७६१ दशलक्ष नोटा गायब झाल्याची माहिती, माहिती अधिकारात मनोरंजन रॉय यांना प्राप्त झाली आहे.
तपास करण्याची मागणी : देवास नाशिक आणि बंगलोर येथील छापखान्यांमध्ये छापण्यात आलेल्या या नोटा रिझर्व बँकेत पोहोचण्यापूर्वीच गायब झाल्या आहेत. या नोटा छापखान्यातून रिझर्व बँकेकडे रवाना झाल्या. मात्र, त्या कधीच रिझर्व बँकेत पोहोचल्या नाहीत अशी माहिती आता माहिती अधिकारात समोर आली आहे. या नोटांवर तत्कालीन रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची सही होती की अन्य कोणाची याबाबत अद्याप स्पष्टता नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जर नोटा चलनामध्ये असतील तर त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला कशी माहिती नाही. केंद्रीय तपास यंत्रणा याबाबत का सजग नाहीत असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात आता केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करून सत्य काय आहे. ते जनतेसमोर आणायला पाहिजे असेही, पवार यावेळी म्हणाले आहेत.
किती नोटांची झाली होती छपाई? :टाकसाळीमध्ये छापण्यात आलेल्या परंतु रिझर्व बँकेपर्यंत न पोहोचलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा या नवीन डिझाईनच्या नोटा होत्या. या नोटांचे मूल्य ८ खर्व ८० अब्ज ३२ कोटी ५० लाख इतके होते. छपाई केलेल्या नोटांपैकी 7 हजार 260 दशलक्ष इतक्याच नोटा पोहोचल्या असल्याचे रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे. अशी माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ता मनोरंजन रॉय यांनी दिली. नाशिक येथील करन्सी नोट प्रेस बँक नोट प्रेस देवास आणि भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रांक प्रायव्हेट लिमिटेड बंगळूरू येथे नोटांची छपाई केली जाते. या नोटा रिझर्व बँकेमार्फत देशभरात वितरित करण्यात येतात.