मुंबई -येथीलमुंबई सेंट्रल, भायखळा, क्लॉसिक रोड, नागपाडा येथील सिटी सेंट्रल मॉलमध्ये गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. आगीने रात्रीच्या सुमारास भीषण रूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर धुरामुळे एक जवान जखमी झाला आहे. मुंबई अग्निशमन दलाने आगीबाबत ब्रिगेड कॉल घोषित केला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे तब्बल 250 अधिकारी कर्मचारी प्रयत्न करत आहे. त्याच वेळी या मॉलच्या बाजूला असलेली 55 मजली ऑर्किड एन्क्लेव ही इमारत खाली करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.
आगीच्या ठिकाणी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांसह इतर यंत्रणांच्या अग्निशमन यंत्रणांचीही मदत घेतली जाणार आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मुंबई सेंट्रल, भायखळा, क्लॉसिक रोड, नागपाडा येथील सिटी सेंट्रल मॉलमध्ये रात्री 8 वाजून 53 मिनिटांच्या सुमारास आग लागली. तळ अधिक चार मजली अशी या इमारतीची रचना आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मॉलमधील लोकांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीला ही आग लेव्हल-1 ची होती. मॉलच्या बाहेरील भिंती काचेच्या असल्याने इमारतीच्या आत प्रचंड धूर पसरला आणि उष्णता निर्माण झाली.
इमारतीत धूर पसरला असला तरी आपल्या जीवाची पर्वा न करता अग्निशमन दलातील जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, रात्रीच्या 10.44 वाजताच्या सुमारास आगीने लेव्हल-3 तर 11.45 वाजताच्या सुमारास आगीने भीषण रूप धारण केल्याने ही आग लेव्हल-4 म्हणून घोषित करण्यात आली. मात्र, मध्यरात्री 2.45 च्या सुमारास ब्रिगेड कॉलची घोषणा करण्यात आली.
आग विझवताना पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, म्हणून एस. के. पाटील, हँगिंग गार्डन मलबार हिल, आझाद मैदान, नाना चौक आदी ठिकाणी वॉटर टँकरमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. घटनास्थळी पालिकेचे आणि मुंबई अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असल्याची अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
- काय आहे ब्रिगेड कॉल?
आग किती भीषण आहे हे आगीच्या लेव्हलवर स्पष्ट होते. लेव्हल 0 असल्यास किरकोळ आग असते. लेव्हल-1 ची आग छोटी असते. त्यात कोणी अडकला असल्याची शक्यता असते. लेव्हल-2 ची आग मध्यम स्वरूपाची असते. त्यात कोणी जखमी असण्याची शक्यता असते. लेव्हल-3 ची आग मोठी असते. यात लोक अडकलेले असू शकतात किंवा त्यात आगीत मृत्यूही झालेले असतात. लेव्हल-4 ची आग ही सर्वात मोठी भीषण आग मानली जाते. लेव्हल-4 ची आग विझवली जात नसेल तर त्या ब्रिगेड कॉल मानला जाऊन तशी घोषणा केली जाते.