महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माटुंग्यातील ‘बिग बझार’मध्ये बेकायदा बांधकाम, गोडाऊनमुळे आग भडकली

आग बेकायदा बांधकाम आणि गोडाऊनमुळेच लागल्याचे समोर आले आहे. याबाबत आलेल्या तक्रारींवरून पालिकेने ‘बिग बझार’ला दोन वेळा नोटीस पाठवली होती.

By

Published : May 1, 2019, 9:00 AM IST

आग

मुंबई - मुंबईमध्ये लोकसभेसाठी मतदान सुरु असतानाच माटुंगा येथील बिग बाजार मॉलला आग लागली होती. मतदानासाठी बिग बाजार बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग बेकायदा बांधकाम आणि गोडाऊनमुळेच लागल्याचे समोर आले आहे. याबाबत आलेल्या तक्रारींवरून पालिकेने ‘बिग बझार’ला दोन वेळा नोटीस पाठवली होती. मात्र न्यायालयात प्रकरण असल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान आगीच्या प्रकरणानंतर आता न्यायालयातून स्थगिती उठवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.

लोकसभा मतदानच्या (२९ एप्रिल) दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास माटुंगा येथील ‘बिग बझार’ला आग लागली. ‘बिग बझार’ ला लागून ‘पाम हाऊस’ इमारत आहे. या दोन इमारतींमध्ये २० फुटांपर्यंत असलेल्या भिंतीला लागून बीग बझारने बेकायदेशीरपणे स्टॉल्स आणि गोडाऊन उभारले आहे. या बेकायदा गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किटमुळेच आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बेकायदा बांधकामामुळे अग्निशमनल दलाला आग विझवण्यात अडथळे निर्माण होऊन तब्बल ६ तासानंतरही वारंवार आगीचा भडका उडत होता. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करून नंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालकाच्या बेजबाबदारपणाबद्दल संबंधित मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

बिग बाजारला लागलेल्या आगीत कपडे, प्लॅस्टिक, तेल आदी सामान जळाल्यामुळे परिसरात धूर आणि दुर्गंधी पसरली. आग आणि दुर्गंधी यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. या प्रकरणी ‘बिग बझार’मधील बेकायदा बांधकामप्रकरणी एमएमआरटीपी अ‍ॅक्टखाली २४ जुलै २०१० मध्येही पालिकेने नोटीस पाठवली होती. संबंधित मालकाने पालिकेच्या नोटीसविरोधात सिटी सिव्हिक कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने पुन्हा १८ मे २०११ रोजी पुन्हा नोटीस पाठवली होती. यानंतर सध्या सिटी सिव्हिक कोर्टमध्ये प्रकरण गेल्यानंतर ४ जुलैला रोजी सुनावणीही होणार होती. मात्र न्यायालयात प्रकरण असल्यामुळे कारवाई केली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details