रत्नागिरी -मुंबई- गोवा मार्गावरील लोटे एमआयडीसीमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा स्फोट झाला, यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आलं आहे. लोटे येथील समर्थ केमिकल्समध्ये हा भीषण स्फोट झाला आहे.
केमिकल रिअॅक्टरमुळे स्फोट झाला, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी गेल्या 3 महिन्यातील या एमआयडीसी मधील स्फोट होण्याची ही तिसरी घटना आहे. तर दोन तासांनी आग विझवण्यात प्रशासनाला यश आले. या ठिकाणी खेड येथील मदत ग्रुप व त्यांच्या सहकारी वर्गाने ही आग विझवण्यासाठी मदत केली. या स्फोटाबद्दल अधिक तपास खेड पोलीस करत आहे. दरम्यान लोटे येथील सगळ्याच कंपन्यांचे आता ऑडिट करण्याची गरज असून त्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तशी मागणी करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.