मुंबई :मरोळ मैदानावर सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान, शारीरिक चाचणीत काही उमेदवारांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी एका आरएफआयडी टॅगची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलीस भरतीत अर्ज केलेल्या 2 उमेदवाराविरोधात पवई पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 420,34 अन्वये 3 मार्च तर 8 उमेदवारांविरुद्ध 4 मार्चला एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
निष्पक्ष आणि प्रामाणिक कामगिरी करण्याचे आवाहन : हा गैरव्यवहार ट्रिगर अलर्टच्या पद्धतीमुळे उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व उमेदवारांना पीईटी भरती दरम्यान त्यांची निष्पक्ष आणि प्रामाणिक कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे. गैरव्यवहारात सहभागी होऊ नका, यामुळे त्यांची प्रक्रियेतून अपात्रता तर होईलच शिवाय त्यांच्यावर गुन्हाही नोंदवला जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.
सहाय्यक मैदान प्रमुख म्हणून नेमणुक :पोलीस निरीक्षक राजेंद्र काळभोर यांच्या फिर्यादीवरून पवई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 फेब्रुवारी पासून काळभोर यांची मरोळ पोलीस मैदान या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई / चालक भरती 2021 च्या बंदोबस्ताकरीता नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी त्यांची सहाय्यक मैदान प्रमुख म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे. मैदानी परिक्षा ही मे. एस. टायमिंग टेक्नोलॉजीज इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीद्वारे आरएफआयडी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 100 मीटर, 800 मीटर व 1600 मीटर धावण्याची चाचणी आयोजित करणे तसेच गोळाफेकीचे आधुनिक पध्दतीने मोजमाप करणे आयोजित केली आहे.