मुंबई- माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्याबद्दल सर्व चित्र स्पष्ट आहे. त्यानंतर त्यांना राज्य मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी अथवा त्यांना पुणेसारख्या ठिकाणच्या पालकमंत्रीपदाचा पदभार देण्यासाठीचा निर्णय हा भाजपच्या कोअर कमिटीत घेतला जाणार असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. त्यामध्ये अनेक नवीन चेहरे यात दिसतील, असेही ते म्हणाले. मंत्रीमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
विखे-पाटलांना मंत्रीपद देण्याचा निर्णय भाजप कोअर कमिटीत - सुधीर मुनगंटीवार - माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील
राज्यात लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. त्यामध्ये अनेक नवीन चेहरे यात दिसतील, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
दुष्काळाच्या संदर्भात आम्ही प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेतो. आजच्या बैठकीत दुष्काळासंदर्भात प्रत्येक विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार सर्व गोष्टी पार पडल्या. त्यात आजच्या सादरीकरणामुळे आम्हाला विश्वास आहे की समाधानकारक आणि योग्य पाऊस महाराष्ट्रात येईल. पाऊस वेळेवर आल्यावर सध्या १५२ तालुक्यात दुष्काळ आहे. तो कमी होईल. तसेच गेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कृत्रिम पाऊसासाठी निविदा काढण्यासाठी अनुमती दिली आहे. आवश्यकता असल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत युतीच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची युती संदर्भात बैठक झाली. त्यावेळीच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलेला फॉर्म्युला लागू करायचा झाल्यास मित्रपक्षांना १८ जागा सोडणार होतो. त्यावर मित्रपक्ष निवडणूक लढतील. जर त्या मित्रपक्षांच्या जागा आमच्या चिन्हावर लढवल्या गेल्या तर त्या आमच्या कोट्यात येतील. मात्र, तसे काहीही होणार नाही. शिवसेना-भाजपचा समान फॉर्म्युलाच निश्चित होणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.