मुंबई : देशभरात नवीन इन्फल्युएंझा आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात इन्फल्युएंझा ए च्या एच १ एन १ चे ३०३ तर एच ३ एन २ चे ५८ रुग्ण आहेत. एच ३ एन २ च्या ५८ पैकी ४८ रुग्ण रुग्णलयात भरती आहेत. एच १ एन १ मुळे ३ तर एच ३ एन २ मुळे २ मृत्यू झाले आहेत. नागपूर, अहमदनगर येथे हे मृत्यू झाले आहेत. त्यांची संशयित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. राज्यात २०१७ ते २०२३ या सात वर्षाच्या कालावधीत एच १ एन १ चे १५ हजार ५५० रुग्ण आढळून आले असून १७०८ मृत्यू झाले आहेत. अशी माहिती राज्याच्या साथ रोग नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे.
काय आहे इन्फल्युएंझा आजार :इन्फल्युएंझा हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझा टाईप ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. एच१ एन१, एच २ एन २, एच ३ एन २ या आजाराचे प्रभाकर आहेत. सर्वसाधारणपणे ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया इत्यादी लक्षणे या आजारात आढळून येतात. इन्फल्युएंझा बाबत रुग्ण सर्वेक्षण हे मुख्यतः लक्षणाधारीत आहे. या बाबत सर्व आरोग्य केंदात रुग्णाची तपासणी करण्यात येते. व त्याप्रमाणे लक्षणानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येतात. अशी माहिती साथ रोग नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे.
सात वर्षात १७०८ मृत्यू :२०१७ मध्ये स्वाईन फ्लू म्हणजेच एच १ एन १ चे ६१४४ रुग्ण आढळून आले त्यापैकी ७७८ मृत्यू झाले. २०१८ मध्ये २५९४ रुग्ण आढळून आले त्यापैकी ४६२ मृत्यू झाले. २०१९ मध्ये २२८७ रुग्ण आढळून आले तर २४६ मृत्यू झाले. २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार असताना १२१ रुग्णांची नोंद होऊन ३ मृत्यू झाले. २०२१ मध्ये ३८७ रुग्णांची तर २ मृत्यूची नोंद झाली. २०२२ मध्ये ३७१४ रुग्णांची तर २१५ मृत्यूची नोंद झाली. २०२३ मध्ये ३०३ रुग्णांची तर २ मृत्यूची नोंद झाली. गेल्या सात वर्षात एच १ एन १ चे १५ हजार ५५० रुग्ण आढळून आले असून १७०८ मृत्यू झाले आहेत.