मुंबई :विमानात साप, उंदीर वगैरे घुसल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, विमानात प्रवास करताना प्रवाशाला विंचू चावल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? विमानातील एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ही घटना 23 एप्रिल रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी महिला काही कामानिमित्त नागपूरला गेली होती.
महिला एअर इंडियाच्या नागपूर-मुंबई फ्लाइटने (AI 630) परतत होती. निर्धारित वेळेत महिला विमानात बसली. त्यानंतर विमानानेही नियोजित वेळेवर उड्डाण केले. विमान आकाशात पोहोचताच अचानक या महिलेचा आरडाओरडा झाला. फ्लाइट अटेंडंटने तातडीने तिच्याजवळ जाऊन चौकशी केली असता महिलेला विंचू चावल्याचे समजले. ही बातमी ऐकून बाकीचे प्रवासीही घाबरले. या घटनेनंतर गोंधळात संपूर्ण विमानाचा शोध घेण्यात आला, मात्र विंचू कुठेच सापडला नाही. तर दुसरीकडे महिलेची प्रकृती गंभीर होत होती. रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. डॉक्टरांनी तिला रात्रभर हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज दिला.
महिला प्रवाशाला विंचू चावला :गेल्या महिन्यात नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावला होता. एअरलाइन्सने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशाला डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर महिलेला घरी सोडण्यात आले आहे.