मुंबई- आम्ही कधीही रात्रीच्या वेळी या पुलावरून जात नव्हतो. परंतु, काल पैसे द्यायचे होते म्हणून बापलेक दोघेही निघालो होतो. तरीही मुलाने मला सांगितलं होते 'अब्बा गर्दी बहुत है ब्रिज के साईड से चलो', आणि काही क्षणातच पूल कोसळला. आम्ही दोघेही ब्रिजवरून खाली कोसळलो. लगेच मी जखमी अवस्थेत मुलाला पाठीवर घेतले आणि तसाच रुग्णालयाच्या दिशेने पळू लागलो. लोकांमधून काहीजण माझ्या मदतीला आले, पण कुठलीही सरकारी यंत्रणा आणि पोलीस मदतीला आले नाही, असे हिमालय पूल दुर्घटनेतील मृत जाहिद खान याचे वडील सिराज मुराद खान सांगत होते. ही घटना सांगत असताना त्यांना अश्रु अनावर होत होते.
सीएसटी स्थानकाच्या जवळ असलेला पूल कोसळून जाहिद खान ठार झाला. परंतु, त्याचे वडील थोडक्यात बचावले अन् फक्त जखमी झाले. मी वाचलो परंतु माझा मुलगा वाचू शकला नाही. त्यामुळे आता माझे सगळे संपलेले आहे, असे सांगत त्यांना रडू आवरत नव्हते. घाटकोपर येथे असलेल्या दामोदर पार्कच्या सी-3 इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ते राहतात. सिराज यांना तीन मुले आहेत. त्यात सर्वात मोठा मुलगा जाहीद होता. तो मागील काही वर्षापासून किचेन, बेल्ट आणि छत्री विक्रीचा व्यवसाय करत होता.
दररोज सकाळच्या वेळात माजिद बंदर येथील मार्केटमध्ये जाऊन माल आणणे आणि व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्ण करणे, असे काम ते रोज सकाळी करून घेतात. मात्र, कालचा दिवस त्यांच्यासाठी घातवार ठरला. ते सकाळ ऐवजी सायंकाळी काम करण्यास निघाले मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. जाहीदचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. एक मुलगी सव्वा महिन्याची असून तिच्या नामकरणाचा विधीही पूर्ण झाला नाही. आता आमच्या कुटुंबातील सगळ्यात कमावता आणि हुशार मुलगा गेला आहे. काळाने आमच्या कुटुंबावर मोठा घाला घातला आहे. आता आमचा मुलगा गेला तर आमचे काही राहिले नाही, असे वडील सिराज खान सांगताना ढसाढसा रडत होते.