मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेत जोरदार चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सर्व पक्षाच्या आमदारांनी जोरदारपणे मांडल्या यामध्ये आमदार सुनील केदार, बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, दादाराव केचे, राहुल कुल, जयंत पाटील, अशा अनेक आमदारांनी या विषयावर आपली मते मांडली. या चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने विविध योजना राबवल्या असून याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचा दावा केला.
शेतकरी पिक विमा योजना तारक : राज्य सरकारने आणलेली शेतकरी पिक विमा योजनेचा प्रीमियम भरण्याची योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. या योजनेचा राज्यातील लाखो शेतकरी लाभ घेत असून दररोज सात लाख शेतकरी विमा योजनेत सहभागी होत आहेत. या राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा यामुळे आता थांबणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो योजना आणि पंतप्रधान योजनेमुळे 12000 रुपये येणार आहेत त्याशिवाय आता प्रीमियम सुद्धा सरकार भरणार आहे त्यामुळे शेतकरी सुखावला असल्याचा दावा मुंडे यांनी केला. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना राबवण्यात आली असून शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याचा दावा त्यांनी केला. या योजनेअंतर्गत चार कोटी 69 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार : राज्य सरकारने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत धरणातला गाळ काढून पाणी साठवून क्षमता अधिक केली जात आहे. तर काढलेला गाळ नापीक शेतात टाकून शेतीची सुपीकता वाढवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिशय लाभदायक अशी ही योजना आहे. असेही मुंडे म्हणाले.