मुंबई - कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याने त्याला कर्जमुक्त करण्याची योजना प्रत्येक सरकार गेली अनेक वर्षे आणत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र थांबलेल्या नाहीत. सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत विदर्भ-मराठवाड्यातील 312 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आता राज्य सरकारनेच जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारनेही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना लागू केली होती. त्यानंतरही या आत्महत्या झाल्याने कर्जमाफी नेमकी कोणाला मिळते, असा प्रश्न आता पुन्हा एकदा विचारला जात आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लेखी उत्तरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कबुली दिली. आशिष शेलार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्य सरकार करीत असलेल्या उपाय योजनांची माहिती विचारताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे म्हटले आहे.