मुंबई - सोशल मीडियावर महापालिकेच्या रुग्णालय व लसीकरण केंद्रांवर सुविधा नसल्याचे, गर्दी झाल्याचे खोटे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. हे सर्व व्हिडिओ चुकीचे असून पालिकेच्या लसिकरणाचे काम शांततेत, सुरळीत सुरू आहे. तसेच कोरोना त्रिसूत्रीची अंमलबजावणी न करणारे पाच नागरिक इतर मुंबईकरांना अडचणीत आणत आहेत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
महापौरांनी घेतला आढावा
मुंबई महापालिका रुग्णालय व लसीकरण केंद्रांवर सोयी सुविधा नसल्याचे, गर्दी झाल्याचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. याची शहानिशा करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा, नायर, सायन आणि केईएम रुग्णालयांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान महापौरांनी लसीकरण केंद्र आणि रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर महापौर बोलत होत्या.
महापालिकेचे काम योग्यच
यावेळी बोलताना, पालिका रुग्णालयाचे व्हिडिओ असल्याचे सांगून काही व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. यासाठी नेमकी परिस्थिती काय हे पाहण्यासाठी आज रुग्णालयांना भेटी दिल्या. सर्वत्र लसीकरण सुरळीत व शांततेत सुरू आहे. जे काही व्हिडिओ पालिकेच्या नावाने व्हायरल केले जात आहेत ते चुकीचे आहेत. महापालिकेचे काम योग्य प्रकारे सुरू आहे, असे महापौर म्हणाल्या.