मुंबई -एसटी संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे ७ मार्च, २०२२ ला एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक ( कर्मचारीवर्ग ) यांच्या स्वाक्षरीने एक खोटे परिपत्रक समाजमाध्यमाव्दारे व्हायरल झाले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
काय आहे पत्र -एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, अशी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी १० मार्च, २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात येईल, अशी घोषणाही अनिल परब यांनी केली होती. या घोषणेनंतर एसटी संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे ७ मार्च, २०२२ ला एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (कर्मचारीवर्ग) यांच्या स्वाक्षरीने एक खोटे परिपत्रक समाजमाध्यमाव्दारे व्हायरल झाले होते. त्यानंतर हे परिपत्रक पुर्णतः खोटे व बनावट असून, कर्मचाऱ्यांमध्ये हेतूपुरस्सर संभ्रम निर्माण करुन त्यांना आपल्या कर्तव्यावरून परावृत्त करण्याच्या गैर-उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्ती अथवा समुहाने प्रदर्शित केले असल्याचे स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत. याशिवाय खोटे पत्र तयार करण्याऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार एसटी महामंडळाच्या वतीने पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.