मुंबई- येथील सायन रुग्णालयाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णाच्या शरीरातून चक्क एका दारूड्याने सीरिंजद्वारे रक्त काढून घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या दारूड्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी सायन पोलिसांच्या हवाली केले आहे.
चक्क दारुसाठी काढले रुग्णाच्या शरीरातून रक्त हेही वाचा-'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं' होर्डिंग लावले कशाला'
रुग्णालयात डॉक्टरचा कोट घालून आलेल्या एका दारूड्याने एका रुग्णाच्या खांद्यावरुन सीरिंजद्वारे रक्त काढून घेतले. त्यानंतर रुग्णाच्या पत्नीला रक्ताचे नमुने तपासण्यासाठी आठशे रुपयाची मागणी केली. एरवी रक्ताचे नमुने घेण्यासाठी रुग्णालयातील परिचारिका येऊन रक्त काढत असतात. मात्र, अचानक आलेल्या अनोळखी व्यक्तीने रक्त काढल्याने, पैशाची मागणी केल्याने संशय आल्याने पीडित रुग्णाच्या पत्नीने पैसे देण्यास नकार दिला.
आठशे रुपये नसतील तर पाचशे रुपये दिले तरी चालतील, असे आरोपीने सांगितल्यानंतर त्यांचावरील संशय आणखीनच बळावला. यासंदर्भात सायन रुग्णालयातील सुरक्षरक्षकांना याची माहिती दिल्यानंतर सुरक्षारक्षकांनी या दारूड्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. अब्दुल गफार, असे त्याचे नाव आहे. तो सायन रुग्णालयात बाहेर एका वडापावच्या गाडीवर हेल्पर म्हणून काम करत होता. मात्र, दारूसाठी पैसे नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
सायन रुग्णालयात या अगोदरही नवजात बाळ चोरी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता थेट रुग्णाच्या जीवाशी खेळ झाल्यामुळे याची गंभीर दखल रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या संदर्भात रुग्णालयातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती चौकशी करत असून या प्रकरणांमध्ये दोषी सापडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी यांनी म्हटलेले आहे.