मुंबई -भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ( Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो जनता रेल्वेने प्रवास करते. त्याअनुषंगाने रेल्वेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज चर्चगेट येथील जनशिकायत कार्यालयात घेण्यात आली. ह्या बैठकीत रावसाहेब दानवे, तसेच रामदास आठवले यांनी आढावा घेतला.
महापरिनिर्वाण दिनी विशेष सोय -रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य, देशभरातून जनसमुदाय मुंबईत येत असतो. त्यांना रेल्वे स्थानकात अधिकाधिक सोयी उपलब्ध करून, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचे दानवे म्हणाले. बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रकाश बुटानी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपापल्या विभागांतील घेण्यात आलेल्या पूर्वतयारीचे रेल्वे राज्यमंत्र्यांना सादरीकरण केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांनी स्पष्ट केले कि, 'महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांना पूर्व नियोजित ब्लॉकचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच नियमित सेवा चालूच राहतील.