मुंबई - ‘स्ट्रीट लॅब’च्या माध्यमातून महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘रस्ते आरेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आरेखनांचे खुले विनामूल्य प्रदर्शन वरळीतील महापालिकेच्या अभियांत्रिकी संकुल, वरळी हबमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट ठरलेली रस्ता आरेखने बघण्याची व ते समजावून घेण्याची सुसंधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची आरेखने तयार करणे, सुधारित करणे इत्यादी कामे यापूर्वी महापालिकेच्या अंतर्गत स्तरावर करण्यात येत होती. परंतु यंदा प्रथमच रस्ते आरेखनांसाठी खुली स्पर्धा आयोजित करण्यात येऊन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मुंबईतील ५ रस्त्यांची आरेखने प्रवेशिका स्वरुपात आमंत्रित करण्यात आली होती. यामध्ये दक्षिण मुंबईतील ‘लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग’ (नेपियन्सी रोड) राजा राममोहन रॉय मार्ग आणि मौलाना शौकत अली मार्ग, पूर्व उपगरातील ‘विक्रोळी पार्क साईट मार्ग क्रमांक १७’ आणि पश्चिम उपनगरातील ‘पी दक्षिण’ विभागातील स्वामी विवेकानंद मार्ग (एस.व्ही.रोड) या ५ रस्त्यांचा तसेच काही रस्त्यांच्या काही भागांचा समावेश आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार फसवे नाही, जे बोलते ते करते- नवाब मलिक