मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांच्याबाजूला रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी ट्विट केला होता. याची दखल घेत या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी चौकशी समितीने 24 तासात अहवाल मागवला असून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या सायन म्हणजेच लोकमान्य टिळक रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या वॉर्डमध्येच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधून ठेवले होते. या मृतदेहाच्या बाजूलाच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व त्या मृतदेहांच्या बाजूला रुग्णांचे नातेवाईक तसेच डॉक्टर, नर्स, कर्मचारी फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हाच व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करत पालिकेचे आणि रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
याची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती या व्हिडिओची सत्यता आणि वास्तविकता पडताळणार आहे. 24 तासात त्याचा अहवाल मागविण्यात आला असून चौकशीत आढळलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, कोव्हिड-19 कक्षातील तसेच संशयित कोव्हिड रुग्णांच्या कक्षातील मृतदेह, मृत्युनंतर 30 मिनिटांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याविषयी संबंधितांना निर्देश देण्यात आले होते. पण, अनेकवेळा रुग्णाचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास उपलब्ध नसतात. त्यांना वारंवार फोन करूनही ते येण्यास टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत संबंधित पोलीस ठाण्यास तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागास कळविण्याची वेळ येते. तसेच सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून मृतदेह शवागारात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतो. असे असले तरी, अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत म्हणून रुग्णालय प्रशासन सर्वप्रकारची काळजी घेत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सक्त निर्देश देण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता इंगळे यांनी कळविले आहे.
रुग्णालय कटिबद्ध
कोरोना विरोधातील लढाईत आरोग्य यंत्रणा पूर्णपणे झोकून देऊन काम करीत आहे. बाधितांना तसेच सर्वसामान्य मुंबईकरांना योग्य ती आरोग्यसेवा मिळावी म्हणून महानगरपालिका प्रशासन वचनबद्ध आहे. अशा घटनांमुळे तसेच विविध अडचणीमुळे विचलित न होता यापुढेही खंबीरपणे आरोग्य यंत्रणा काम करीत राहील. आपणसर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे इंगळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -मास्क न घालताच राज ठाकरे मंत्रालयात...