मुंबई : गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या आईसह विनाकारण कारागृहाच्या चार भिंतीआड राहणाऱ्या चिमुकल्यांना आता पोलादी पिंजरा सोडून मोकळ्या वातावरणात बालपण जगता येणार आहे. या मुलांना आपले बालपण मनसोक्त जगता यावे, त्यांच्या बालमनावर सकारात्मक परिणाम होऊन योग्य दिशेने वाटचाल व्हावी यासाठी कारागृह विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला कैद्यांच्या मुलांसाठी खुशखबर असल्याची माहिती मिळत आहे. महिला कैद्यांच्या मुलांनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी भायखळा कारागृहात पहिल्यांदाच नन्हें कदम बालवाडी सुरू करण्यात आली आहे तसेच तेथे हिरकणी कक्षाची ही स्थापना केली आहे.
मुलांना प्राथमिक शिक्षण : भायखळा कारागृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार भायखळा जिल्हा कारागृहात 350 महिला कैदी बंदिस्त आहेत. शून्य ते सहा वयोगटातील जवळपास 14 ते 15 लहान मुले आपल्या आईसोबत कारागृहात दाखल आहेत या लहान मुलांना दररोज कारागृहाबाहेरील वातावरणात शिक्षणाची संधी मिळावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत महिला सेविका आणि मदतनीस यांची नेमणूक करून कैद्यांच्या लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते.
बालवाडीसोबत हिरकणी कक्षाचे उद्घाटन : कारागृह परिसरामध्ये कारागृहाच्या बाहेर महिला कैद्यांच्या आणि कारागृह कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी नन्हें कदम बालवाडी आणि हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बालवाडी आणि हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी अमिताभ गुप्ता यांच्यासह कारागृह दक्षिण विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी राज्य कारागृह विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर कारागृहात नवनवीन उपकम राबविण्यास सुरुवात केली आहे.