मुंबई :कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 मार्गातील आरे कारशेड वादात अडकले आहे. या कारशेडला जोरदार विरोध होत असून आता राज्य सरकारनेही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ला दणका देत कारशेड आरेतून हलवण्याच्यादृष्टीने आदेश दिले आहेत. पण, यावर अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. अशात पर्यावरणप्रेमी मात्र अजूनही आरे कारशेडच्या मुद्द्यावरून एमएमआरसीवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मेट्रो 6 प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. पण, अद्याप यासाठी कारशेडची जागाच निश्चित करण्यात आलेली नाही. तेव्हा मेट्रो 3 मध्ये आधीच कारशेडचा अट्टहास का, असा सवाल करत पर्यावरणप्रेमींनी एमएमआरसीला पुन्हा एकदा 'टार्गेट' केले आहे.
पर्यावरणप्रेमी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी मेट्रो 6, लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी-कंजूरमार्ग मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) कडे माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती. मेट्रो 6 साठी कुठे कारशेड उभारण्यात येणार आहे, याची जागा कुठे आहे असे प्रश्न विचारण्यात आले होते. यावर डीएमआरसीने उत्तर दिले आहे. त्यानुसार अजूनपर्यंत मेट्रो 6 मधील कारशेडसाठी जागा निश्चित झालेलीच नसल्याचे डीएमआरसीने स्पष्ट केल्याचे बाथेना यांनी सांगितले. मेट्रो 3 वगळली तर इतर सर्व मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत आहे. तर, मेट्रो 6 चे बांधकाम डीएमआरसी कंत्राटदाराच्या रुपाने करत आहे. दरम्यान एमएमआरडीएकडून मेट्रो 7 चे काम वेगात सुरू असून एक-दीड वर्षात मार्ग बांधून पूर्ण होईल. पण, अद्याप या मार्गासाठी एमएमआरडीएला कारशेडची जागा मिळालेली नाही. मात्र, तरीही काम वेगात सुरू आहे.