झगमगाट प्रकरणी नितीन राऊत यांनी वापरले 'दलित कार्ड'; राजकारण तापणार? - मंत्र्यांच्या बंगले नुतनीकरण
उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयाचे नुतनीकरण सुरू आहे. यावर होणाऱ्या खर्चावरून भाजपने टीका करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मी दलित असल्यानेच भाजपाला माझा तिरस्कार असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई - मी कोणतेही नियमबाह्य काम केलेले नाही, असे स्पष्टीकरण ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. भाजपने राऊत यांच्या शासकीय बंगला आणि कार्यालयाच्या सुशोभीकरणवर कोट्यवधीचा खर्च झाल्याचा आरोप केला होता, यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मी दलित असल्यानेच माझा त्यांना तिरस्कार वाटतो, असा गंभीर आरोपही नितीन राऊत यांनी केला आहे. या प्रकरणात आता राऊत विरोधात भाजप असा वाद रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
राज्यात महावितरणकडून वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे. तर दुसरीकडे ऊर्जामंत्री राऊत यांच्या सरकारी निवासस्थान आणि कार्यालयाच्या पुनर्बांधणीसाठी कोट्यवधीचा खर्च केला जात असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांनी ही उधळपट्टी थांबवून राऊत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
राऊत यांचा पलटवार
ऊर्जा मंत्री राऊत यांनी, यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, पर्णकुटी बंगल्याची स्थिती आजही वाईट अवस्थेत आहे. सध्या या बंगल्याचे काम सुरू झाले आहे. मात्र कोरोना काळामुळे मी शासकीय निवास स्थान न मिळाल्याने भाड्याच्या घरात राहत होतो. त्याबाबत कोणी काही बोललं नाही. मात्र घराची दुरुस्ती केल्यावर खर्च झाल्याचे भाजपकडून आरोप केले जात आहेत. आरोप करण्यापूर्वी स्वतः पक्षाच्या दालने, निवासस्थाने तपासायला हवीत, असा सल्ला नितीन राऊत यांनी भाजपला दिला आहे. तसेच भाजपने आम्हालाही एक संधी दिली असून लवकरच आम्ही भाजपचा चित्रपट बाहेर काढू, असा इशारा नितीन राऊत यांनी काढला.
दलित असल्याने तिरस्कार
सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधीन राहून जे काम करतात तेच काम सुरू आहे. मात्र लोकांना ते मान्य नाही. मात्र लोकांनी काय समजायचे ते समजावे. मला चांगले राहायला आवडते, त्यामुळे ते काम नियमानुसारच आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच मी दलित असल्यानेच माझा तिरस्कार करतात असाही आरोप राऊत यांनी भाजपावर केला.
ऊर्जा खाते माझ्याकडेच-
मी दलित समाजाचा व्यक्ती आहे, त्यामुळे माझ्याकडून खाते काढून घेतल्याच्या बातम्या चालविल्या जात आहेत. नुसते बातम्या चालवल्याने काही होत नाही. बातम्या बघून पक्षश्रेष्ठीं काही माझे खाते काढणार नाहीत, ते माझ्याकडेच राहिल, असा खुलासा राऊत यांनी केला आहे.
वाचा संबंधित वृत्त -ऊर्जा मंत्र्यांच्या बंगल्यात कोट्यवधीचा 'झगमगाट'; भाजपचा आक्षेप