मुंबई- राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांशी अशा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतील वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे येत्या मंगळवारी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाचे सचिव तथा विकास आयुक्त, (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 3 सप्टेंबरला - aaditya thakre
कार्यक्रमाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. होतकरु तरुण-तरुणी, लघु उद्योजक, अंमलबजावणी यंत्रणा, बॅंकेचे अधिकारी व विविध औद्योगिक संघटनांना निमंत्रित केले असून, सुमारे 2000 तरुण-तरुणी व संबंधित अधिकारी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा-अटल बिहारी वाजपेयी लेझर पार्कमध्ये सर्वच राष्ट्रीय नेत्यांचे माहितीपट उलगडणार
कृषीपूरक व कृषीवर आधारीत उद्योग, उत्पादन उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असून, लाभार्थ्यांची वयोमर्यादा 18 ते 45 इतकी असून याअंतर्गत महिला, अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 50 वर्ष पर्यंत राहिल. शैक्षणिक पात्रता 10 लाखाच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान 7 वी पास व 25 लाखांच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान 10 वी पास असेल.
योजनेअंतर्गत 30 टक्के महिला उद्योजकांसाठी व 20 टक्के उद्दिष्ट अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. राज्यातील नव उद्यमींना सुक्ष्म लघु उद्योग सुरु करण्यास सहाय्य व रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणारे व व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे, अशी माहिती डॉ. कांबळे यांनी यावेळी दिली.