मुंबई- राज्यभरात कोरोनाने पाय पसरविण्यास सुरुवात केली असून नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. अशा नकरात्मक वातावरणात एक दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानीच्या वीज दरात कपात करण्यात आली आहे. ५ ते ११ टक्क्यांनी वीज स्वस्त होणार असून पुढच्या ५ वर्षांसाठी वीज दरात कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती राज्य वीज नियामक आयोगाने दिली आहे.
मुंबईत अदानीची वीज सर्वात महाग असून त्यामुळे ग्राहक हैराण आहेत. टाटा, बेस्ट आणि महावितरणची वीज ही अनेकांना परवडत नाही. त्यामुळे, वीज दर कमी करण्याची मागणी सातत्याने होत होती. पण, आता राज्य वीज नियामक आयोगाने ही मागणी मान्य करत राज्यातील सर्व ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पुढच्या ५ वर्षासाठी महावितरण, टाटा, बेस्ट आणि अदानीचे वीज दर कमी करण्यात येत आहेत. १ एप्रिलपासून नवे दर लागू होतील, असेही त्यानी सांगितले.