मुंबई : मुंबई : राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, कोल्हापूर या सारख्या १८ स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत १ जानेवारी २०२२ ला संपली आहे. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच प्रभाग रचनेच्या पुनर्रचनेबाबतच्या याचिकेवर निर्णय प्रलंबित असल्याने या निवडणुका रखडल्या आहेत. आरक्षण, प्रभाग पुनर्रचनेबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांची आहे. तर दुसरीकडे शिंदे - फडणवीस सरकारच्या वैधतेचा निकाल प्रलंबित आहेत.
लोकसभेच्या निवडणुका : पुढीलवर्षी म्हणजेच २०२४ ला लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या अनेक राज्यात निवडणुका त्यापूर्वी होत आहेत. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. येत्या काही दिवसांत न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. शिंदे गटाविरोधात हा निकाल आल्यास राज्यातील सरकार कोसळले. परिणामी राष्ट्पती राजवट किंवा सहा महिन्यांसाठी नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील. शासन आणि आयोगाचा यात वेळ खर्ची होईल. त्यामुळे लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकी बरोबरच विधानसभा आणि गेल्या वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र घेण्याचे प्रस्तावित आहे. निवडणूक आयोगाला तशा सूचना देण्यात आल्याचे समजते.
पंतप्रधानांची संकल्पना सत्यात उतरवणार :देशात कोणत्या ना कोणत्या भागात सातत्याने होणाऱ्या निवडणुकांमुळे अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने विकासावर विपरीत परिणाम होतो. या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा देखील खर्च होतो. पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक देश एक मत' ही संकल्पना मांडली. यासाठी वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या निवडणुकांचे वेळापत्रक पुढे-मागे करून २०२४ पर्यंत लोकसभा, विविध विधानसभा व केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणुका एकत्रित होतील, अशी तजवीज करणारा प्रस्ताव तयार केला. सर्व निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचे त्यात नमूद केले आहे. त्यानुसार लवकरच एकत्रितपणे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या आदेशानुसार तयारीला सुरुवात केली आहे.
निवडणुकीत चुरस :येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता आहे. दसऱ्या सणानंतर निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला जाईल. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून विविध राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक मुंबईसह राज्यात तळ ठोकून आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० जागांवर जिंकून भाजप आघाडीचा पक्ष असेल, असा भाजपचा दावा आहे. तर महाराष्ट्रात भाजप - शिंदे गटाला पूरकस्थिती नाही. महाविकास आघाडी या निवडणुकीत बाजी मारेल. तशी व्यूहरचना आखली असून भाजपला रोखणार असल्याचे आघाडीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.