मुंबई- कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग समन्वयक मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पत्र लिहून जाहीर निषेध व्यक्त केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आदराने पुनर्स्थापना करावी, अशी मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करा, एकनाथ शिंदे यांची मागणी - shivaji maharaj mangutti
ज्यांनी पुतळा हटवला त्यांच्यावर कारवाई करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी पुनर्स्थापित करावा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.
यापूर्वी जेव्हा मनगुत्ती गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता, तेव्हाही पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला असल्याची माहिती समोर येत आहे. मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या पूर्व परवानगीने हा पुतळा बसविण्यात येऊन सुद्धा स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने तो रातोरात हटवला, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच ज्यांनी पुतळा हटवला त्यांच्यावर कारवाई करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी पुनर्स्थापित करावा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.