मुंबई-शालेय शिक्षण विभागाने दोन दिवसांपूर्वी दिवाळीची सुटी पाच दिवसांसाठी जाहीर करणारा एक जीआर जारी केला होता. मात्र, त्यावर राज्यातील शिक्षण संघटनांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्याच विभागाच्या निर्णयावर यू-टर्न घेतला असून त्यासाठी दिवाळीच्या सुटीचा जीआर २४ तासांत बदलत नवीन जीआर काढला आहे.
दिवाळीच्या सुटीसाठी काढण्यात आलेल्या नवीन जीआरनुसार राज्यात विद्यार्थी आणि शिक्षकांना दिवाळीची सुटी 14 दिवसांची करण्यात आली आहे. ही सुटी उद्या शनिवारी, 7 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ती 20 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या सुटीदरम्यान राज्यातील सर्वच शाळांचे पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतचे सर्व ऑनलाईन वर्ग या काळात बंद राहणार आहेत. शिक्षण विभागाच्या या नव्याने काढण्यात आलेल्या जीआरचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसोबत इतर शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
असा होता पूर्वीचा पाच दिवसांचा जीआर -
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना दिवाळीची सुटी देण्यासाठी 5 नोव्हेंबर 2020 रोजी एक जीआर काढला होता. या शासन निर्णयानुसार दिवाळी सुटी 12 ते 16 नोव्हेंबर अशी केवळ ५ दिवसांची केली होती. याला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. परिणामी त्याची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २४ तासात निर्णय बदलून दिवाळीची सुटी 14 दिवसांची केली.