महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांचे गुणही समानतेवर आणू; विनोद तावडे यांचा अजब दावा - admission

अकरावीच्या प्रवेशाबाबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एक अजब दावा केला आहे. सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी आदी मंडळाचे जे विद्यार्थी राज्यात अकरावीला प्रवेश घेतील त्यांचे अंतर्गत गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, यासाठी आपण त्यांना राज्यात समानतेवर आणू, असे तावडे म्हणाले.

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे

By

Published : Jun 11, 2019, 7:23 PM IST

मुंबई- दहावीच्या परीक्षेत अंतर्गत गुणांमध्ये लाखो विद्यार्थांना कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर केंद्रीय मंडळांच्या अधिकच्या टक्केवारीमुळे अकरावी प्रवेशाचे मोठे संकट उभे राहिलेले आहे. त्यावर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एक अजब दावा केला आहे. सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी आदी मंडळाचे जे विद्यार्थी राज्यात अकरावीला प्रवेश घेतील त्यांचे अंतर्गत गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, यासाठी आपण त्यांना राज्यात समानतेवर आणू, असा दावा तावडे यांनी केला आहे. आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दहावीची निकालाची यंदाची टक्केवारी घसरली आहे. त्यावर तावडे यांनी काही दिवसांपूर्वीच आम्ही वाढलेल्या गुणांची सूज कमी केल्याचे वादग्रस्त विधान केले होते. आज आपल्याकडे पालक, मुख्याध्यापक संघटनांचे काही प्रतिनिधी आले होते. त्यांनी सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळाच्या विद्यार्थांना अकरावीत प्रवेश देताना त्यांचे अंतर्गत गुण प्रवेशसाठी देण्यात येऊ नयेत, अशी सूचना मला केली आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि संबंधित मंडळाशी चर्चा करणार असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात केंद्रीय मंडळांपैकी आयबी मंडळातील अत्यंत कमी विद्यार्थी हे अकरावीच्या प्रवेशासाठी येतात. तर सीबीएसई, आयसीएसईतील साडेचार टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी येतात. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असे सांगत, केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्यातील विद्यार्थ्यांप्रमाणे समान पातळीवर आणता येईल, असेही तावडे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details