महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विना अनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत मार्चमध्ये बैठक - विनोद तावडे

शाळांना महापालिकेने अनुदान सुरू करावे, अशी मागणी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, आयुक्त अजोय मेहता महापालिकेकडे पैसाच नाही तर अनुदान कुठून देणार या भूमिकेवर अडून बसले आहेत.

By

Published : Feb 27, 2019, 11:46 AM IST

विना अनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत मार्चमध्ये बैठक - विनोद तावडे

मुंबई - महापालिकेने मान्यता दिलेल्या विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे यासाठी आझाद मैदानात १६ दिवस उपोषण सुरू आहे. या शाळांना अनुदान देण्याबाबत मार्च महिन्यात बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले. तावडे यांनी आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांना भेट दिली त्यावेळी हे आश्वासन दिले.

विना अनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत मार्चमध्ये बैठक - विनोद तावडे

मुंबईमधील खासगी विना अनुदानित शाळांमधून सुमारे २५ वर्षांपासून काम करणाऱ्या या शिक्षकांना ४ ते ५ हजार रुपये वेतन दिले जाते. काही संस्थाचालक त्यांना पूर्ण वेतनही देऊ शकत नाही. यामुळे या शाळांना महापालिकेने अनुदान सुरू करावे, अशी मागणी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, आयुक्त अजोय मेहता महापालिकेकडे पैसाच नाही तर अनुदान कुठून देणार या भूमिकेवर अडून बसले आहेत.


शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी गटनेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षीयांनी अनुदान द्यायला मान्यता दिली आहे. त्यानंतरही आयुक्त दुर्लक्ष करत असल्याने सातमकर यांनी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सर्व पक्षीय गटनेत्यांनी आयुक्तांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विना अनुदानित शाळांना अनुदान द्यायचे झाल्यास किती निधी लागेल याची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांना केल्या होत्या. त्यानंतरही अद्याप प्रशासनाकडू कोणतीही कार्यावही झाली नसल्याने आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाच्या ठिकाणी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी सायंकाळी भेट दिली. मला तुमचा प्रश्न माहीत आहे. पालिका अनुदान देत नाही. राज्य सरकारकडून अनुदान येणे बाकी आहे मी इतर शाळांच्या अनुदानाचे प्रश्न सोडवले आहेत. आपलाही प्रश्न सोडवणार आहे. त्यासाठी महापौर, पालिका आयुक्त तसेच आंदोलांकर्त्यांच्या शिष्ट मंडळाची बैठक येत्या १ किंवा २ मार्चला आयोजित करून मार्ग काढतो असे आश्वासन तावडे यांनी दिले. शिक्षण मंत्र्यानी आश्वासन दिले असले तरी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

किती कोटींची गरज -

मुंबई महापालिकेद्वारे मान्यताप्राप्त अनुदानित ४११ व विनाअनुदानित ६८५ शाळा आहेत. पैकी ५८१ शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. म्हणजे १०४ शाळा इतर माध्यमाच्या असून त्यांना अनुदान देणे गरजेचे आहे. त्यांना २०१० पासून अनुदान द्यावयाचे झाल्यास २५० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. पुढील आर्थिक वर्षापासून अनुदान देण्यास सुरुवात केल्यास ३० कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे लागणार आहेत आणि सेवानिवृत्ती उपदानासह ४० ते ४५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. अशी आकडेवारी सातमकर यांनी आयुक्त अजोय मेहता यांना सादर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details