मुंबई- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंगळवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. त्यानंतर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ताब्यात घेण्यात आले होते. विहंगची तब्बल पाच तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्याला पुन्हा घरी जाऊ दिले आहे. मात्र, आज पुन्हा विहंग यांची चौकशी केली जाणार आहे. प्रताप सरनाईक यांचीही आजच चौकशी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिल्लीहून आलेल्या ईडीच्या पथकाकडून सीआरपीएफच्या संरक्षणात मुंबई व ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी विहंग ग्रुप कंपनीच्या संदर्भातील हॉटेल्स, बांधकाम जागा व इतर कार्यालयांवर धाड टाकण्यात आली होती.
मुंबईतील अंधेरी परिसरातील टॉप्स ग्रुपच्या कार्यालयावर धाड मारण्यात आल्यानंतर यासंदर्भात चौकशी केली जात होती. त्यावेळेस विहंग सरनाईक यास ताब्यात घेण्यात आले असता मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी तब्बल पाच तास विहंग सरनाईक यांची चौकशी केल्यानंतर त्यास घरी जाऊ सोडण्यात आले. दरम्यान यासंदर्भात प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया मिळाली असून मुंबई व महाराष्ट्राची जर कोणी बदनामी करत असेल तर मी गप्प बसणार नाही, यापुढेही बोलत राहीन, ईडीची कारवाई सूडबुद्धीने झालेली असल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
कोण आहेत प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला. बालपणीच वर्धा जिल्ह्यातून मुंबईला स्थायिक झाले. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबिवलीच्या एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ रिक्षा चालवली. १९९७ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेऊन राजकारणात उडी मारली. १९९७ मध्ये ठाणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. २००८ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. २००९ मध्ये ते आमदार झाले. ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते तीनदा आमदारपदी निवडून आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात त्यांनी १२५ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता दाखवली होती.