महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या, बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी - रोहीत पवार

ED raid on Baramati Agro राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर तथाकथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने छापेमारी सुरू केलीय. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचं बोललं जातंय. जाणून घ्या कुठे सुरुय छापेमारी.

ED raid on baramati agro
बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 2:53 PM IST

मुंबई ED raid on Baramati Agro : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या अडचणी आता वाढल्यात. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर तथाकथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने छापेमारी सुरू केलीय. मुंबईसह सहा ठिकाणी ही छापीमारी सुरू आहे. या छापेमारी संदर्भात रोहित पवार यांनी सूचक ट्विट करत या प्रकरणात आपण संघर्ष करणार असल्याचं सूचित केलंय.


ॲग्रो कंपनीमध्ये कोणालाही प्रवेश नाही : रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणांवर छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये बारामती, पुणे आणि मुंबई इथल्या कार्यालयांचा समावेश आहे. बारामती ॲग्रो कंपनीच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून सहा जागी या धाडी टाकण्यात आल्या असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस बजावली होती. 72 तासात बारामती ॲग्रो कंपनीचा प्लांट बंद करण्याचे आदेश नोटीसमध्ये दिले होते. यानंतर या नोटीसीच्या विरोधात न्यायालयात धाव घेत रोहित पवार यांनी स्थगिती मिळवली होती. ईडीने छापेमारी केल्यानंतर बारामती ॲग्रो कंपनीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

रोहित पवार यांचे सूचक ट्विट : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलय की, हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवण या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमिला संघर्षात काही प्रदीर्घ इतिहास आहे. त्यामुळे मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. महापुरुषांच्या फोटोचा कोलाज वापरत त्यांनी हे ट्विट केलं आहे. एकूणच केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात आता संघर्ष करावा लागेल असं त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलंय.

मूळ प्रकरण काय : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं (२९ सप्टेंबर २०२३) रोजी रात्री उशिरा दोन वाजता बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई केली. प्रदूषण मंडळाच्या नियमांचं उल्लंघन बारामती अग्रो कंपनीकडून झाल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसमध्ये त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी केवळ ७२ तासांचा अवधी दिला होता. या संदर्भात रोहित पवारांकडून वकील अक्षय शिंदे यांनी न्यायालयात बाजू मांडली होती.

न्यायालयानं काय दिले होते आदेश : गेल्या सुनावणीवेळी या प्रकरणासंबंधी उच्च न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाले होते. त्यानंतर खंडपीठानं याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. (दि. 19 ऑक्टोबर) रोजी हा निकाल त्यांनी जाहीर केला. निकाल जाहीर करत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं रोहित पवारांना बजावलेली नोटीस उच्च न्यायालयानं आदेश देत अखेर रद्द केली. या नोटीसमध्ये पर्यावरण कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन बारामती ॲग्रो कंपनीनं केल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं न्यायालयापुढे प्रश्न उपस्थित केल्यावर न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलंय की, पंधरा दिवसांत बारामती ॲग्रो कंपनी या संदर्भात खुलासा लेखी स्वरूपात जारी करेल. मात्र त्या खुलाशावर एमपीसीबीचं समाधान झालं नाही, तर एमपीसीबीनं त्यानंतर कायदेशीर कारवाई करावी, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात नमूद केलंय.

हेही वाचा :

1आता ८० वर्षाच्या व्यक्तींनी मार्गदर्शन करावे, अजित पवारांचा शरद पवारांना टोला

2आमच्या दोन जागा मुख्यमंत्र्यांकडं, पण पक्षानं जबाबदारी दिली तर लोकसभा लढवेन-हसन मुश्रीफ

3बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे कोणामुळं निवडून आल्या? अजित पवारांनी उडविली खिल्ली

ABOUT THE AUTHOR

...view details