मुंबई - पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सखोल तपास केला जात आहे. या तपासादरम्यान, ईडीने दिल्लीत एक मोठी कारवाई केली आहे. यात ईडीने १०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
ईडीने दिल्लीत कैलास कॉलनीत असलेल्या काही हॉटेल्सची जप्ती केली आहे. हे हॉटेल एचडीआयएल कंपनीचे राकेश वाधवान व इतर व्यक्तींच्या नावावर असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ईडीने ही कारवाई केली.
लिब्रा रिलेटर्स व लिब्रा हॉटेल्स असे ईडीने कारवाई केलेल्या हॉटेल्सची नावे आहेत. या हॉटेल्सच्या प्रमोटर कंपनीकडून तब्बल 247 कोटी रुपयांचे कर्ज पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेकडून घेण्यात आलेले होते. हे 247 कोटी पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 6 हजार 117 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील एक भाग आहे.
दरम्यान, ईडीने यासंदर्भात राकेश वाधवान, सारंग वाधवान व बँकेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाकडून वाधवान पिता-पुत्रांना 'हाऊस अरेस्ट' करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशावर सुप्रिम कोर्टाकडून स्थगिती घालण्यात आली. नंतर या दोन्ही आरोपींना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात यावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
हेही वाचा -कंगनाच्या कार्यालयावरिल कारवाई योग्यच, तिची याचिका रद्द करावी - मुंबई महानगरपालिका
हेही वाचा -राज्यातील विद्यापीठांना दिलासा; अंतिम वर्ष परीक्षांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत युजीसीने दिली मुदतवाढ