मुंबई- दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी मुंबईच्या अंधेरी येथील तरुणाने कागदी लगद्यापासून इकोफ्रेंडली, पर्यावरणपूरक आणि कमी वजनाच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. अवघ्या 9 इंचापासून अडीच ते तीन फुटाच्या एक किलो ते अडीच किलो वजनाच्या ३०० पेक्षा अधिक गणेशमूर्ती त्याने तयार केल्या आहेत.
कागदी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकार रोहित वस्ते यांनी खास बंगळुरूरहून प्रशिक्षण घेतले आहे. मातीची मूर्ती तयार करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो तर कागदी गणेशमूर्ती तयार करण्यास २ दिवस लागतात. मूर्ती वाळविण्यासाठी ३ दिवसांचा कालावधी लागत असून त्यावर अंतिम हात देण्यासाठी २ दिवस लागतात.