मुंबई-मागील काही वर्षांपासून वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. लोअर परेलमधील रुस्तम बिल्डिंगमधील रहिवासी गेल्या 40 वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. रुस्तम बिल्डिंगमध्ये हा निसर्गाचा राजा गणेशाची प्रतिमा भींतीवर रेखाटण्यात येते. उत्सवाचा समारोप आणि विसर्जन इको फ्रेंडली पद्धतीने केले जाते.
लोअर परेलमधील नागरिकांनी 40 वर्षांपासून जोपासली 'इको फ्रेंडली' गणेशोत्सवाची परंपरा
लोअर परेल मध्ये असणाऱ्या रुस्तम बिल्डिंगमधील रहिवाशांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची परंपरा 40 वर्षांपासून जोपासली आहे. गणपतीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना न करता येथे भींतीवर गणेशाची प्रतिमा रेखाटण्यात येते. कोणताही अवास्तव खर्च न करता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने येथील गणेशाला निसर्गाचा राजा म्हणून ओळखले जातेय.
40 वर्षांपूर्वी लोअर परेलमधील रुस्तम बिल्डिंगमधील रहिवासी महादेव कांदळगावकर यांनी एका छोट्या काळ्या फलकावर बाप्पांचे चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी या बिल्डिंगमधील सुधीर सावंत यांनी पुढाकार घेतला. रहिवाशांचा उत्साह आणि श्रद्धा पाहून सुधीर सावंत यांनी हा गणपती भिंतीवर साकारण्यास सुरुवात केली. 40 वर्षे झाली तरी ही परंपरा सुरु आहे. सुधीर सावंत यांचा मुलगा शार्दुल सावंत गेल्या 3 वर्षांपासून गणपतीची प्रतिमा भींतीवर रेखाटत आहे.
ना आगमनाचा खर्च, ना विसर्जनाचा...ना कोणती वर्गणी यामुळे रुस्तम बिल्डिंगमधील या बाप्पाला निसर्गाचा राजा म्हणून ओळखले जाऊ लागलेय. या इको फ्रेंडली बाप्पाचे विसर्जनही इको फ्रेंडली पद्धतीने केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी येथे अर्पण करण्यात आलेल्या नारळांतील पाणी या गणपती बाप्पाच्या प्रतिमेवर शिंपडले जाते. गणपतीच्या प्रतिमेवर शिंपडलेले हे पाणी एका बादलीत जमा केले जाते आणि बिल्डिंगमधील असलेल्या तुलसी वृंदावनात टाकले जाते.