मुंबई Mumbai Housing :हिंदू धर्मामध्ये वर्षात साडेतीन मुहूर्त शुभ आणि महत्वाचे मानले जातात. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीतील पाडवा. या साडेतीन मुहूर्ताला सोनं-चांदी, वाहन तसंच गृहप्रवेश आणि नवीन घर खरेदी केली जाते. देशात सर्वाधिक महागडी घरं ही मुंबईत आहेत. मुंबईत घर खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण घरांच्या किंमती आणि जागेचा गगनाला गेलेला भाव पाहता, सर्वसामान्यांना मुंबईत घर खरेदी करणं परवडत नाही. मात्र, असं असलं तरी प्रत्येक वर्षी मुंबईत दिवाळी सणात घरांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दरम्यान, यावर्षी देखील दिवाळीत मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी झाल्याची माहिती समोर आली असून यंदा 1 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत शहरात 5,143 घरांची विक्री झाली आहे.
महारेराकडे 824 नवीन गृह प्रकल्पांच्या नोंदणी :दिवाळीच्या मुहूर्तावर 824 नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणी झाल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात 645 तर 13 नोव्हेंबरपर्यंत 178 अशा एकूण 824 नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची महारेरात नोंदणी मंजूर झाल्याची माहिती महारेराचे अध्यक्ष, अजय मेहता यांनी दिली आहे. घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून, तसंच बिल्डरांच्या शंका आणि नोंदणीसाठी आलेल्या प्रत्येक प्रकल्पाची आर्थिक कायदेविषयक आणि तांत्रिक पडताळणी कठोरपणे केली जाते, असं देखील महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांनी सांगितलं.