मुंबई :सदिच्छा साने या एम. बी. बी. एस. विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी मिट्टू सुखदेव सिंग या आरोपीला अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये वांद्रे बॅंडस्टँड येथून मुलीचे अपहरण करण्यात आले होते. जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने तिचा खून करून तिचा मृतदेह समुद्रात टाकला आहे. पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. यात आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
डॉ. सदिच्छा साने बेपत्ता : पालघर येथे राहणारी आणि जे. जे. रुग्णालयातील डॉ. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी सुमारे वर्षभरानंतर पोलिसांनी जीवरक्षक मिट्टू सिंग (३२) याला अटक केल्यानंतर गेल्या शनिवारी आणखी एकाला अटक केली आहे. अब्दूल जब्बार अन्सारी असे या आरोपीचे नाव असून तो सदिच्छा साने ज्या रात्री गायब झाली. त्या रात्री मिट्टू सिंग याच्या संपर्कात होता. सदिच्छा साने प्रकरणाच्या शोधात मुंबई पोलीस दिल्ली आणि उत्तर प्रदेशला ही जाऊन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सदिच्छाबाबत आक्षेपार्ह संभाषण : मिट्टू चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी न्यायालयात त्याच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला होता. पोलिसांनी मिट्टू विरोधात पुरावे गोळा केले. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्याला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये मिट्टू याच्यासोबत सदिच्छा असताना त्याने अब्दूलला संपर्क केला, दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली. यामध्ये दोघेही सदिच्छा हिच्याबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील बोलत असल्याचे तपासातून समोर आल्यानंतर पोलिसांनी शनिवारी अब्दुल याला अटक केली.